कुपवाड – आचार्य जावडेकर गुरुकुल, इस्लामपूर येथील संगणक कक्षाचे अनावरण कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ इंडस्ट्रीज अँड कॉमर्सचे अध्यक्ष तथा उमेद उद्योग समूहाचे संचालक सतीश मालू यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी भारतमाता विद्यार्थी वसतिगृहाचे माजी विद्यार्थी व आचार्य जावडेकर गुरुकुलच्या माजी विद्यार्थी संघाचे सक्रिय सदस्य व उद्योजक हरिभाऊ गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना सतीश मालू म्हणाले, साहित्यिक मनाचे हरिभाऊ गुरव यांचा सामाजिक सलोखा आणि सामाजिक उत्तरदायित्व निभावण्याचे कार्य आम्हां सर्वांना प्रेरणादायी आहे. तसेच या गुरुकुलचे कार्यही संपूर्ण महाराष्ट्रात आदर्शवत आहे. येथून घडणारे विद्यार्थी नक्कीच या गुरुकुलचे नाव उंचावतील यात तिळमात्र शंका नाही.
यावेळी हरिभाऊ गुरव यांनी ५ संगणकसह फर्निचर आचार्य जावडेकर गुरुकुलचे मुख्याध्यापिका कल्याणी पाटील यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी उद्योजक राहूल गुरव, माजी गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब शेटे, संकुलाचे शालेय समिती अध्यक्ष माणिक मोरे (तात्या) यांच्यासह संकुलातील सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.