पंचायत समिती कागल आयोजित मासिक सभा संपन्न,

Share News

कागल : मंगळवार दिनांक ०७ एप्रिल २०२६ रोजी पंचायत समिती कागल येथील मासिक सभा आयोजित करण्यात आलेली होती. सदर सभा पंचायत समितीच्या सभापती सौ.सुवर्णा शशिकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

सभेतील ठळक मुद्दे –
१) घर घर संविधान या योजनेअंतर्गत उद्देशिकाची फ्रेम अनुसूचित जाती व उपयोजना अंतर्गत मागासवर्गीय लाभार्थ्यांना फोटो फ्रेम चे वाटप करण्यात आले. तालुक्याला १५ फ्रेम समाज कल्याण विभागाकडून उपलब्ध झाल्या होत्या. या उद्देशिकांचे वाटप सभापती, उपसभापती व सदस्यांच्याकडून कृषि विभाग कागल कडील मागासवर्गीय लाभार्थ्यांना उद्देशिकेचे वाटप करण्यात आले.

२) जिल्हा परिषद कोल्हापूर येथील अध्यक्ष पदाचा मान सर्वप्रथम कागल तालुक्यास मिळाळयाबद्दल सौ.शिल्पाताई शशिकांत खोत यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्याबाबत मा.सदस्य श्री दिपक सोनार यांनी सुचीत केले. त्यानुसार, सर्वानुमताने नुतन जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.शिल्पाताई शशिकांत खोत यांच्या अभिनंदनाचा ठराव घेणेत आला.

३) सार्वजनिक आरोग्य विभागाकडील महत्वपुर्ण अभियान माझ गाव आरोग्य संपन्न गाव या योजनेची माहिती तालुका आरोग्य अधिकारी यांनी दिली. या अभियानांतर्गत ग्रामीण भागांमध्ये आरोग्य सेवांची गुणवत्ता उंचावणे, प्रतिबंधात्मक आरोग्य सेवांना चालना देणे, लोकांचा जनसहभाग वाढवणे हा व्यापक उद्देश असल्याचे सांगण्यात आले. तसेच या अभियानामध्ये उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या आरोग्य संस्थांचे मुल्यांकन करण्यात येणार असून पुरस्कार जिंकण्याची संधी असल्याचे सांगण्यात आले. सदरचे अभियान ग्रामीण भागात उपयुक्त ठरणारे असल्याने याचे सखोल नियोजन करुन अभियान यशस्वीरित्या राबवण्याचा सुचना सभापती यांनी आरोग्य विभागाला दिल्या.

४) शहरी भागांप्रमाणे ग्रामीण भागामध्येही २५ दिवस किंवा त्यापेक्षाही अल्प कालावधीत गॅस सिलेंडर चे वितरण करण्यात यावे अशा सुचना तालुका पुरवठा अधिकारी यांना देण्यात आल्या तसेच ज्या गॅस वितरकांच्या बाबत तक्रारी आहेत, नोंदणी केलेल्या ग्राहकांपर्यंत गॅस वितरण वेळेत केले जात नाही किंवा इतरांच्या नावावर गॅस उचल केली जात आहे असे प्रकार थांबवण्याच्या सुचना सभापती व उपसभापती यांनी तालुका पुरवठा अधिकारी यांना दिल्या.

५) लहान क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना तालुका कृषि योजनांचा फारसा लाभ मिळत नसल्याचे सांगून अशा शेतकऱ्यांना वेळेत बि-बीयाणे मिळणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. बीयाणे वेळेत न मिळाल्याने शेतकरी नाईलाजाने पेरणी करतात व नंतर हे बीयाणे ज्यांना आवश्यकता नाही त्यांना वाटप केले जाते. त्यामुळे बियांनाचे वाटप वेळेत होणे गरजेचे असल्याचे सदस्यांकडून सांगण्यात आले. तसेच कृषि सहाय्यक यांच्या कामकाजाबद्दल सदस्यांनी नाराजी व्यक्त केले. दिलेल्या गावांमध्ये कृषि सहाय्यक नियमित भेटी देत नाहीत, शेतकऱ्यांच्या अडीअडचणींचे निराकरण केले जात नाही, PM किसान चे अनुदाबाबत वारंवार तक्रारी येत असल्याचे सदस्यांकाडून सांगण्यात आले. यावर सभापती व उपसभापती यांनी सर्व कृषि सहाय्यक यांची बैठक बोलवण्यात यावी व या बैठकिला पंचायत समितीच्या सर्व पदाधिकारी यांना बोलवण्यात यावे व अडीअडचणींचे निराकरण करण्यात यावे असे तालुका कृषि अधिकारी यांना सुचना दिल्या.

६) सध्या दूधगंगा धरणामध्ये ९.१७ टीएमसी पाणी साठा असून सध्या पिण्याच्या पाण्याबाबत तुटवडा जरी नसला तरी उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता शेतीच्या सिंचनासाठी लागणारे पाणी शेतकऱ्यांनी काटकसरीने वापर करावे असे सांगून सदस्यांनीही आपल्या मतदारसंघात याबाबात सुचना देऊन सहकार्य करावे अशाप्रकारचे आवाहन जलसंपदा विभाग, कागल चे प्रतिनिधी केले.

७) जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढवण्याबाबत सभापती यांनी विशेष भर दिला. यासाठी ग्रामीण भागामध्ये पालकांना भेटी देऊन मुलांना जिल्हा परिषद शाळांमध्ये दाखल करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे असे सभापती यांनी सांगीतले. तसेच ज्या शाळांची पटसंख्या पुरेशी असेल अशा शिक्षकांचा सत्कार पंचायत समितीव्दारे करण्यात येणार असल्याचे सभापती यांनी सांगीतले.

८) सध्या अंगणवाडीचे सकाळचे सत्र सुरु आहे. ग्रामीण भागामध्ये अंगणवाडी सेविका, मदतनिस या वेळेवर अंगणवाडी सुरु करीत नसल्याचे निदर्शनास येत असल्याचे सभापती यांनी माहिला बालकल्याण अधिकारी यांना विचारणा केली. पं. स. सदस्य यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली. यावर मा.सभापती यांनी अशा घटना होऊ नयेत याकरीता तात्काळ परिपत्रक निर्गमीत करुन अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना दखल घेण्यास सांगीतले. तसेच सुपरवायझर व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी अंगणवाडींना अचानक भेटी देऊन अंगणवाडींची तपासणी करण्याचे सांगीतले.

९) ७५ वर्षावरील प्रवाशांसाठी कॅशलेस कार्ड सुविधा NCMC उपलब्ध होणार असल्याचे कागल आगार प्रमुखांनी सांगीतले. या स्मार्ड कार्ड चा वापर प्रीपेड वॉलेट म्हणून एसटी तीकीट, रेल्वे तीकीट इ. साठी याचा उपयोग होणार असल्याचे सांगण्यात आले. या कार्ड साठी ग्रामीण भागांमध्ये कॅम्पचे आयोजन केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

या सभेला पंचायत समितीचे सभापती, उपसभापती तसेच पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. सचिव म्हणून पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उपस्थित होते. तसेच जिल्हा स्तरावरुन मार्गदर्शक अधिकारी म्हणून जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय हे उपस्थित होते. पंचायत समितीचे सर्व कार्यालय प्रमुख व तालुक्यातील इतर लाईन डिपार्टमेंटचे कार्यालय प्रमुख उपस्थित होते. मासिक सभेचे कामकाज कक्ष अधिकारीअधिक्षक यांनी पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Icon Join Our WhatsApp Channel
error: Content is protected !!