
कोल्हापूर : आमदार अमल महाडिक यांनी कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्यासह महापालिकेच्या सर्व विभागाच्या प्रमुखांची व्यापक आढावा बैठक घेतली. या बैठकीला शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजित घाटगे यांच्यासह महानगरपालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयांचे सहाय्यक आयुक्त, आरोग्य अधिकारी, आरोग्य निरीक्षक तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार महाडिक यांनी कोल्हापूर शहरातील अपूर्ण असणाऱ्या ड्रेनेज पाईपलाईन, पाणी पाईपलाईन आणि गॅस पाईपलाईनची विभागनिहाय माहिती घेतली. अमृत २.० मधून बापट कॅम्प परिसरात सुरू असलेल्या ड्रेनेज पाईपलाईनचे काम का थांबले आहे अशी विचारणा आमदार महाडिक यांनी केली. यावेळी उत्तर देताना जल अभियंता घाटगे यांनी या परिसरातील रस्तेत नव्याने केल्यामुळे हे काम थांबल्याचे स्पष्ट केले. यावर लवकरात लवकर तोडगा काढून ड्रेनेज लाईनचे काम पूर्णत्वाला न्यावे. ड्रेनेज कामासाठी रस्ते उतरल्यानंतर रेस्टोरेशनचे काम दर्जेदार होईल याकडे लक्ष देण्याच्या सूचना महाडिक यांनी दिल्या. ड्रेनेज पाईपलाईन चे काम पूर्ण करण्याची डेडलाईन ठरवण्याच्या सूचना आमदार महाडिक यांनी दिल्या. कोल्हापूर शहरातील बंद अवस्थेतील पथदिवे बदलण्यासाठी नवीन एजन्सीची नियुक्ती लवकरात लवकर करावी. सद्यस्थितीला स्वनिधीतून 600 पथदिवे देण्याची घोषणा आमदार महाडिक यांनी केली.
कोल्हापूर शहरातील उद्यानांची स्थिती सुधारण्यासाठी PPP तत्वावर उद्याने विकसित करण्यासाठी द्यावी. यासाठी महावीर उद्यानात प्रायोगिक तत्त्वावर प्ले एरिया आणि स्नॅक्स स्पॉट सुरू करून उद्यानाचे सुशोभीकरण करून घ्यावे असेही महाडिक यांनी सांगितले. यावर आयुक्त भारुड यांनीही अशा पद्धतीचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे सांगितले. कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाच्या कामाने वेग घेतला असून या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी दीड कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे. हा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आयुक्त यांनी केली. यावर तातडीने प्रस्ताव तयार करावा मुख्यमंत्र्यांकडून खास बाब म्हणून हा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही आमदार महाडिक यांनी दिली. शहरातील विनापरवाना बांधकामांवर काय कारवाई केली? अशी विचारणा आमदार महाडिक यांनी केली. यावर शहर अभियंता मस्कर यांनी लवकरच बेकारीशी बांधकामे आणि अतिक्रमण विरोधात धडक मोहीम उघडणार असल्याचे सांगितले. अतिक्रमण निर्मूलनावेळी पोलीस प्रशासनाचे सहकार्य घ्यावे, अतिक्रमणे पुन्हा होऊ नयेत यासाठी कडक कार्यवाही करावी अशा सूचना महाडिक यांनी दिल्या. घरातील नालेसफाई च्या कामांबाबत समाधान व्यक्त करताना पावसाळ्यात खुदाईची कामे कटाक्षाने टाळावीत असे निर्देशही आमदार अमल महाडिक यांनी दिले.
शहरातील सीसीटीव्ही यंत्रणाअदयावत करण्यासाठी पोलीस प्रशासनासोबत स्वतंत्र बैठक घेऊन मार्ग काढावा. सुट्टीच्या कालावधीत शहरात येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी शौचालय उभारण्याच्या कामाचा आढावाही महाडिक यांनी घेतला. शहरातील वर्दळीच्या ठिकाणी शौचालयांची सोय झाल्यास पर्यटकांची अडचण दूर होईल याकडेही आमदार महाडिक यांनी लक्ष वेधले. शहरातील दिशादर्शक फलक आणि चौक सुशोभीकरणा संदर्भात या बैठकीत विस्तृत चर्चा झाली. शहरातील एक चौक स्वनिधीतून सुशोभित करून देण्याची घोषणा आमदार महाडिक यांनी केली.
शहरातील महत्त्वाचे रस्ते दुरुस्ती, पाईपलाईन गळती काढणे यासाठी विशेष निधी उपलब्ध करून दिला जाईल. पावसाळ्यापूर्वी ही सर्व कामे करून घेण्यासाठी आराखडा बनवावा अशा सूचनाही महाडिक यांनी दिल्या.
शेंडा पार्क येथे नव्याने उभारत असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरी, कोमनपा प्रशासकीय इमारत, इतर विविध प्रशासकीय कार्यालये तसेच प्रस्तावित खंडपीठासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा,ड्रेनेज लाईन, पथदिवे,रस्ते यांचा आराखडा बनवून कामाला गती द्यावी असे निर्देश आमदार महाडिक यांनी दिले.
छत्रपती शिवाजी महाराज स्कूल ते तावडे हॉटेल दरम्यानच्या उड्डाणपुलाच्या कामासाठी कन्सल्टंट नेमणूक दृष्टिक्षेपात आली आहे. या संदर्भातील ठराव लवकरात लवकर मंजूर करून घ्यावा यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही आमदार महाडिक यांनी दिली. पंचगंगा नदी प्रदूषण आणि रंकाळा प्रदूषणासंदर्भात पावसाळ्यापूर्वी ठोस उपाय योजना राबवाव्यात. पंचगंगा स्मशानभूमी साठी स्वतंत्र निधी आणण्याची ग्वाही महाडिक यांनी दिली.