
भगवा फडकविण्यासाठी एक पाऊल मागे घेतलेल्या शिवसैनिकांना योग्य न्याय देवू : आमदार राजेश क्षीरसागर
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले. महायुतीचा भगवा फडकवून शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेवून शिवसेनेने दिलेल्या उमेदवारांच्या पाठीशी रहावे, असे आवाहन आमदार राजेश क्षीरसागर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या शिवसेनेच्या पदाधिकारी व शिवसैनिकांना केले होते. याकरिता आमदार राजेश क्षीरसागर यांनी गेली दोन दिवस विविध बैठकांच्या माध्यमातून या उमेदवारांचे मनपरिवर्तन केले. त्यांच्या या प्रयत्नांनी शिवसेनेतील बंडखोरी शमल्याचे दिसून आले.
याबाबत बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, महायुतीचा भगवा फडकविण्यासाठी एक पाऊल मागे आलेल्या शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांचे आभार.. उमेदवारी मागण्याचा अधिकार सर्वांनाच आहे परंतु, पक्षातर्फे घेण्यात आलेले सर्व्हे, स्थानिक प्रभागातील परिस्थिती यासर्वांचा सारासार विचार करून काही वेळेस कठोर निर्णय घेणे गरजेचे असते. परंतु, ज्यांना सक्षम असूनही उमेदवारी देवू शकलो नाही, त्यांनी अन्याय झाला असे न समजता, नाराज न होता शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे “महानगरपालिकेवर भगवा” फडकविण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी पक्षाने दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशी राहून त्यांना निवडून आणण्यात मोलाचे योगदान द्यावे. उमेदवारी न मिळालेल्या सक्षम पदाधिकारी, शिवसैनिकांना पुढच्या काळात लवकरच महामंडळे, राज्य, जिल्हा व तालुकापातळीवरील शासनाच्या विविध समित्या, कोल्हापूर महानगरपालिकेअंतर्गत स्वीकृत नगरसेवक, शिक्षण समिती, परिवहन समिती आदी इतर प्रमुख समित्यांच्या पदांवर नियुक्ती देण्यात देवून त्यांना न्याय देण्यात येईल, अशा शब्दही आमदार राजेश क्षीरसागर यांनी उमेदवारी मागे घेतलेल्या पदाधिकारी व शिवसैनिकांना दिला. यासह सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी शिवसेनेचा भगवा महानगरपालिकेवर फडकविण्यासाठी सज्ज व्हावे, सर्वांच्या समजूतदार पणातून शिवसेना एकसंघ, एककुटुंब राहिल्याची भावना आमदार क्षीरसागर यांनी व्यक्त केली.
प्रभाग क्र. २ मधून शिवसेना उपशहरप्रमुख अरविंद मेढे, उपजिल्हाप्रमुख विनय वाणी, प्रभाग क्र.६ मधून अनुसूचित जाती जमातीचे जिल्हाप्रमुख निलेश हंकारे, प्रभाग क्र.११ मधून आशिष पोवार, संदीप पोवार, भाग्यश्री किशोर माने, प्रभाग क्र.७ मधून अभिजित सांगावकर, सचिन बिरंजे, प्रभाग क्र.१२ मधून माजी नगरसेवक इंद्रजित उर्फ जितू सलगर, रविंद्र पाटील, प्रभाग क्र.१४ मधून शशिकांत रजपूत यांनी आज आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले.