
कोल्हापूर : कोल्हापुरातील बहुप्रतिक्षित आयटी पार्क चा प्रश्न सोडवण्यासाठी आमदार अमल महाडिक यांनी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उद्योग मंत्री उदय सामंत, माहिती तंत्रज्ञान राज्य मंत्री इंद्रनील नाईक आणि कृषिमंत्र्यांसोबत पत्रव्यवहार करून महाडिक यांनी आयटी पार्क चा पाठपुरावा सुरू ठेवला आहे. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कोल्हापुरातील शेंडा पार्क येथे आयटी पार्कसाठी ३४ हेक्टर, जिल्हा क्रीडा संकुलासाठी ६ हेक्टर तसेच शासकीय दंतवैद्यकीय महाविद्यालयासाठी २ हेक्टर अशी एकूण ४२ हेक्टर जमीन उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.
या मागणीची तातडीने दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूल विभागाच्या मुख्य सचिवांना कार्यवाहीचे निर्देश दिले होते.
त्यानुसार कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जमीन उपलब्ध करून देण्यासंदर्भातील प्रस्ताव आणि त्यावरील पुणे विभागीय आयुक्तांचा अहवाल अप्पर मुख्य सचिवांकडे प्राप्त झाला असून लवकरच कोल्हापूर आयटी पार्क, जिल्हा क्रीडा संकुल आणि शासकीय दंतवैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा हस्तांतरित होण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होईल अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
गेली अनेक वर्षे रेंगाळत पडलेला आयटी पार्क चा प्रश्न आता सुटणार असून आमदार अमल महाडिक यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश येण्याची चिन्हे आहेत.
कोल्हापुरातील आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांना नोकरीच्या निमित्ताने पुणे बंगळूर हैदराबाद यासारख्या शहरांमध्ये स्थलांतरित व्हावे लागते. कोल्हापुरात आयटी पार्क ची सुरुवात झाल्यानंतर हे स्थलांतर थांबणार असून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर जिल्हा क्रीडा संकुलाच्या माध्यमातून खेळाडूंसाठी नवी साधने उपलब्ध होणार आहेत तसेच शासकीय दंतवैद्यकीय महाविद्यालयामुळे दंत वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोल्हापुरातच प्रवेश घेणे सुलभ होणार आहे.
कोल्हापुरातील शेंडा पार्क मध्ये ही जमीन उपलब्ध झाल्यानंतर कोल्हापूरच्या प्रगतीमध्ये भर पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी वेळोवेळी केलेल्या सहकार्यामुळे हे शक्य झाल्याचे आमदार अमल महाडिक यांनी सांगितले.