
कागल : फाळणी नकाशाची नक्कल देण्यासाठी अवघ्या एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना कागल तालुका भूमी अभिलेख कार्यालयातील दप्तरीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागने रंगेहात पकडले. शिवराम कृष्णा कोरवी (वय ५३, रा. हुपरी) असे अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. तक्रारदाराने २६ नोव्हेंबर रोजी फाळणी नकाशासाठी अर्ज केला होता. या कामासाठी कोरवी याने सुरुवातीला दीड हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीनंतर एक हजार रुपयांवर व्यवहार ठरला. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची शहानिशा झाल्यानंतर विभागाने सापळा रचला. वर्षाच्या अखेरच्या दिवशी, कोरवी हा तक्रारदाराकडून एक हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना पथकाने त्याला रंगेहात पकडले. कोरवी हा ऑक्टोबर २०२५ मध्ये पदोन्नतीने दप्तरी म्हणून रुजू झाला होता. पुढील तपास सुरू आहे.