कोल्हापूर शहरातील समस्या दूर करण्याला प्राधान्य द्या- आमदार अमल महाडिक

Share News

नूतन आयुक्तांसमवेत घेतली आढावा बैठक

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांची आमदार अमल महाडिक यांनी भेट घेतली. कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त पदी निवड झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन डॉ .भारुड यांचे आमदार महाडिक यांनी स्वागत केले. यावेळी संपन्न झालेल्या आढावा बैठकीत आमदार महाडिक यांनी कोल्हापूर शहरातील विविध विषयांवर चर्चा केली. कोल्हापूर शहरातील रस्त्यांचे काम दर्जेदार होण्यासाठी आयुक्तांनी स्वतः लक्ष घालण्याचे निर्देश महाडिक यांनी दिले. शहरात संकलित होणाऱ्या घनकचऱ्यावर प्रक्रिया करणारा नवीन प्रकल्प उभारण्यासाठी आराखडा तयार करावा, केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून निधीसाठी पाठपुरावा केला जाईल अशी ग्वाही आमदार महाडिक यांनी दिली. शहरातील क्रीडांगणे आणि उद्यानांच्या सुशोभीकरणासाठी लोकसहभागातून प्रयत्न करावेत तसेच महानगरपालिकेच्या शाळांना उर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी विविध कंपन्यांच्या सीएसआर फंडातून निधीसाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही आमदार महाडिक यांनी दिली. शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा मजबूत करण्यासाठी महापालिकेने प्रयत्न करावेत. केएमटीकडे नव्याने येणाऱ्या इलेक्ट्रिक बसेससाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ भरती तातडीने करावी. रंकाळा आणि पंचगंगा प्रदूषण निर्मूलनासाठी तातडीने आराखडा तयार करावा तसेच पूर परिस्थिती सारख्या नैसर्गिक आपत्तींचे व्यवस्थापन करण्यासाठी महापालिकेने सक्षम यंत्रणा उभारावी असे निर्देश आमदार अमल महाडिक यांनी दिले. केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शहरासाठी येणारा निधी योग्य ठिकाणी खर्च होत आहे का? यावर आयुक्तानी अंकुश ठेवावा असे मत आमदार महोदयांनी व्यक्त केले. कोल्हापूर शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेसंदर्भात समाधान व्यक्त करताना शहर विद्रुप करणाऱ्या आणि वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या अतिक्रमणांवर होणाऱ्या कारवाईत सातत्य ठेवावे असे निर्देशही महाडिक यांनी दिले. या बैठकीला नगरसेवक प्रा. जयंत पाटील, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, सहाय्यक आयुक्त विजय पाटील, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजीत घाटगे, सुरेश पाटील यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Icon Join Our WhatsApp Channel
error: Content is protected !!