
जयसिंगपूर ( शिरोळ ) : NEET परीक्षा घोटाळ्यामुळे ४ विद्यार्थ्यांची आत्महत्या; पालकांचे संसार उद्ध्वस्त, विद्यार्थ्यांमध्ये तीव्र मानसिक तणाव
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) मार्फत घेण्यात आलेल्या ‘नीट’ (NEET) वैद्यकीय प्रवेश परीक्षेत झालेल्या प्रचंड गैरव्यवहार आणि घोटाळ्यामुळे संपूर्ण देशातील विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या घोटाळ्याच्या नैराश्यातून आतापर्यंत देशातील चारहून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली आहे. ही आत्महत्या नसून सरकारी अनास्थेने केलेली हत्या आहे. त्यामुळे या घोटाळ्याला जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकारी, दलाल आणि संस्थाचालकांवर तात्काळ ‘सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मा. खासदार राजू शेट्टी यांनी केली.
यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले कि गेल्या आठवड्यापासून सांगली , सातारा , कोल्हापूर , सोलापूर , कोकण या भागात फिरत असताना नीट परीक्षार्थी पालक व विद्यार्थी हतबल झाले असल्याचे दिसून आले. वैद्यकीय क्षेत्रात जाऊन देशाची सेवा करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या गरीब आणि मध्यमवर्गीय पालकांनी आपले आयुष्य पणाला लावले होते.
अनेक पालकांनी आपली हक्काची शेतजमीन (रान) विकली, काहींनी राहते घर गहाण ठेवून किंवा विकून मुलांच्या कोचिंग क्लासेसची आणि शिक्षणाची फी भरली. रक्ताचे पाणी करून पालकांनी गोळा केलेला पैसा आणि मुलांची मेहनत या घोटाळ्यामुळे एका झटक्यात मातीत मिळाली आहे. पेपर फुटी आणि गुणांमधील फेरफारमुळे पात्र विद्यार्थ्यांना डावलून पैसेवाल्यांना प्रवेश मिळत असल्याने प्रामाणिक विद्यार्थी सध्या तीव्र मानसिक तणावाखाली आहेत.
पेपरफुटीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची अवैध उलाढाल होते. सत्ताधाऱ्यांच्या जवळ राहिल्याने शासकीय गोपनीय बैठका, परीक्षांचे नियोजन आणि कंत्राट कोणाला मिळणार, याची गुप्त माहिती या दलालांना आधीच कशी मिळते. पेपर फुटीचे धागेदोरे हे सत्तेसोबत असणा-या लोकांच्या सभोवताली फिरत आहे. यामुळे याची सखोल चौकशी करून संबंधितावर बुलडोझर फिरविण्याची हिम्मत सत्ताधारी मंडळींत आहे का? सरकारमधील यंत्रणाच बरबरटलेली असल्याने असे प्रकार घडत असल्याची टिका शेट्टी यांनी केली.