
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील बऱ्याच मिळकतींचे प्रॉपर्टी कार्ड नसल्यामुळे मिळकत धारकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते. याची दखल घेत आमदार अमल महाडिक यांनी कोल्हापूर शहरातील सर्व मिळकतींचा ड्रोन सर्व्हे होण्यासंदर्भात सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू ठेवला होता. या सर्व्हेसाठी लागणारा निधी जिल्हा नियोजन समिती मधून उपलब्ध करण्यातही आमदार महाडिक यांना यश आले होते. गुरुवारी पुणे येथे झालेल्या बैठकीत महाराष्ट्र शासनाच्या वतीने जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कोल्हापूर यांनी भारत सर्वेक्षण संस्थेचे महाराष्ट्र आणि गोवा विभागाचे संचालक डी के सिंग यांच्यासोबत सामंजस्य करार केला. या करारानुसार कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीतील तब्बल १५४.५१८ चौरस किलोमीटर क्षेत्रातील मिळकतींचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण केले जाणार आहे. यासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान भारत सर्वेक्षण संस्थेद्वारे पुरवण्यात येणार असून २८ मे ते १० जून २०२६ या कालावधीत कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्राचे ड्रोन द्वारे छायाचित्रण करून मिळकत पत्रिका आणि नकाशा तयार करण्यात येणार आहे. दिनांक २६ मे रोजी यासाठी ड्रोन हवेत झेपावणार असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सर्व मिळकतींचे सर्वेक्षण होऊन २डी नकाशे तयार केले जाणार आहेत.
पुणे येथे पार पडलेल्या सामंजस्य करारानंतर सर्वेक्षण संस्थेने तातडीने कोल्हापूर विमानतळाचे एअरपोर्ट डायरेक्टर आणि डीजीसीएकडे पत्रव्यवहार करून ड्रोन उड्डाणाचा तपशील कळवला आहे.
अशा पद्धतीने संपूर्ण शहराचे ड्रोन सर्वेक्षण होऊन मिळकतींचे नकाशे आणि प्रॉपर्टी कार्ड तयार होणारी कोल्हापूर ही महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका ठरणार आहे.
कोल्हापूर शहरातील सर्व मिळकतींना प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून लवकरच ड्रोन सर्वेद्वारे सर्व मिळकतींचे नकाशे तयार होतील.
शहरवासीयांच्या प्रॉपर्टी कार्डची समस्या सोडवण्याचे दिलेले वचन पूर्णत्वाला गेल्याबद्दल मनस्वी आनंद वाटतो.
या कामी सहकार्य केल्याबद्दल पालकमंत्री प्रकाश आबिटकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्राताई पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार!
- आमदार अमल महाडिक
- कोल्हापूर दक्षिण विधानसभा