ग्रामपंचायत अर्जुनी येथे स्वच्छ भारत मिशन टप्पा-२ अंतर्गत प्लास्टिक कचरा वहन वाहनाचा शुभारंभ!

Share News

कागल : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा -२ अंतर्गत ग्रामीण भागातील प्लास्टिक कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी कागल पंचायत समितीच्या वतीने एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. आज, सोमवार दिनांक १८ मे २०२६ रोजी, ग्रामपंचायत अर्जुनी येथून प्लास्टिक कचरा वहन करणाऱ्या वाहनाचा अधिकृत शुभारंभ अत्यंत उत्साहात करण्यात आला.
या महत्त्वपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ कागल पंचायत समितीच्या सभापती सौ.सुवर्णा शशिकांत पाटील आणि उपसभापती इंद्रजीत पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला. ग्रामीण भाग कचरामुक्त आणि प्लास्टिकमुक्त करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत मोलाचा ठरेल, असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.
कागल तालुक्यातील ८३ ग्रामपंचायतीमध्ये सार्वजनिक ठिकाणी कचरा संकलननासाठी कचरा संकलन केंद्राची व्यवस्था केली आहे. या कचरा संकलन केंद्रातून प्लास्टीक कचरा उचलण्यासाठी ०७ मार्ग तयार करण्यात आलेले आहेत. सर्व ग्रामपंचायतीचा कचरा या ७ मार्गाव्दारे संकलीत करुन सिध्दनेर्ली, चिखली व कापशी येथील प्लास्टीक संकलन केंद्रामध्ये एकत्रीत केला जाऊन त्यावर प्रक्रिया करुन पुनर्वापरासाठी पाठवण्यात येणार आहे.
या प्रसंगी कागलचे गट विकास अधिकारी (BDO) कुलदीप बोंगे उपस्थित होते. त्यांनी स्वच्छ भारत मिशन टप्पा -२ च्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकला आणि गावातील प्लास्टिक कचरा हा प्लास्टीक संकलन केंद्रामध्येच टाकून त्याच्या सुयोग्य वहनासाठी ग्रामस्थांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
या सुवर्णक्षणी अर्जुनी गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी प्रवीणसिंह सुळकुडे, गट समन्वयक रणजित जाधव यांच्यासह ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Icon Join Our WhatsApp Channel
error: Content is protected !!