
आषाढी वारीकरिता येणारे वारकरी व भाविक कोल्हापूर, इस्पुरली, हळदी मार्गे पायी तसेच इतर मार्गे वाहनातून येत असतात. कोल्हापूर व इतर ठिकाणावरून वारकरी भाविक पायी दिंडी घेऊन येत असतात. पुईखडी, वाशी नाका या ठिकाणी मोठा रिंगण सोहळाही असतो. त्या रिंगण सोहळ्यास पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक, ग्रामस्थ उपस्थित असतात. अशा या पालखी सोहळ्या दरम्यान प्रशासनातील संबंधित सर्व यंत्रणांनी चांगल्या प्रकारे नियोजन करून हा सोहळा यशस्वी करा अशा सूचना राजेश क्षीरसागर यांनी यावेळी दिल्या. जिल्ह्यातून व कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमा भागातून सुमारे एक लाख वारकरी व भाविक यात्रेसाठी येत असल्याने या ठिकाणी आवश्यक तयारी तसेच वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा उभारण्यासाठी प्रशासनाला या बैठकीत सूचना देण्यात आल्या.
राजेश क्षीरसागर यांनी पालखी मधील वारकऱ्यांसाठी पालखी मार्गावर ठिकठिकाणी फिरते शौचालय उभारण्याच्या सूचना केल्या. यासाठी आवश्यक शौचालयांची सुविधा महानगरपालिका, ग्रामपंचायत यांच्यासह कारखान्यांमधून करावी असे ते म्हणाले. घाट परिसरात रथ वर चढताना वाहतूक बंद करण्याची आवश्यकता आहे या अनुषंगाने पर्यायी मार्ग किंवा वाहतूकच थांबवता येते का याची पडताळणी वाहतूक शाखेने करावी. तसेच गर्दीच्या रस्त्यांवर फेरीवाल्यांना लागूनच थांबू देऊ नये. महापालिका भागातील दिंडी रस्त्यावर आवश्यक डागडूजी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. अग्निशमन वाहनासह, स्वच्छतागृह, आरोग्यासाठी सुविधा तसेच ॲम्बुलन्सची व्यवस्था ठिकठिकाणी करण्याचेही त्यांनी यावेळी प्रशासनास सांगितले. या पालखी सोहळ्याचे मुख्य आकर्षण नव्याने तयार करण्यात आलेला रथ असून ठिकठिकाणी आवश्यक मदत ग्रामपंचायतने उभी करावी असे त्यांनी सांगून चढ रस्त्यावर विशेष खबरदारी बाळगण्याचे त्यांनी सांगितले.या बैठकीत आमदार चंद्रदीप नरके यांनी दिंडी दरम्यान आवश्यक स्वच्छता करून त्या ठिकाणी नेमण्यात आलेल्या चाळीस सहाय्यकांद्वारे चांगले नियोजन करण्याच्या सूचना केल्या. ते म्हणाले, रिंगण ठिकाणी वारकरी अनवाणी चालतात त्यामुळे तेथील जागा स्वच्छ आणि रस्ते चांगले असावेत. त्या ठिकाणी आवश्यक आरोग्य सुविधा निर्माण करून गाड्या, दुचाकी पालखी दरम्यान आत येणार नाहीत याची काळजी वाहतूक शाखेने घ्यावी. करवीर प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांनी प्रशासनाने नियोजनाबाबत नंदवाळ मध्ये बैठक घेतली असल्याचे सांगून त्या म्हणाल्या, प्रशासकीय स्तरावर संबंधित विभागांना समन्वयासाठी सूचना दिलेल्या आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पिंपळे यांनी ग्रामीण भागातून त्या ठिकाणी आवश्यक ॲम्बुलन्ससह आरोग्य कर्मचारी नेमण्यात आल्याचे सांगितले. एक लाख भाविक उद्दिष्ट ठेवून त्याबाबत नियोजन करण्यात आले असून आरोग्य व पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी 24 तास पथक त्या काळात कार्यरत असेल असे म्हणाले.