
कोल्हापूर : शहरातील शाळा आणि महाविद्यालय परिसरात वाढत चाललेल्या वाहतूक नियमांच्या उल्लंघनांवर अंकुश ठेवण्यासाठी कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून आज मोठी कारवाई मोहीम राबविण्यात आली. अल्पवयीन वाहनचालक, विना लायसन्स वाहन चालविणे, तिघे बसून प्रवास करणे, मोबाईलवर बोलत वाहन चालविणे आणि अडथळा निर्माण करणाऱ्या पार्किंगसह विविध उल्लंघनांच्या १३७ केसेस नोंदवून एकूण २ लाख ३२ हजार ५०० दंड आकारण्यात आला.
विवेकानंद कॉलेज, महावीर कॉलेज, शहाजी कॉलेज, गोखले कॉलेज आणि न्यू कॉलेज परिसरात सकाळी १० ते १२ या दोन तासांच्या कालावधीत १८ अंमलदारांच्या पथकांमार्फत ही मोहीम राबविण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये वाढत असलेल्या बेजबाबदार वाहनचालक प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अपर पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली होती. अल्पवयीन चालकांच्या १२ केसेसवर तब्बल ५५ हजार दंड आकारला गेला तर तिब्बल सिट, मोबाईल वापर, नो पार्किंग आणि लायसन्स जवळ न बाळगणे या इतर प्रकारांवर स्वतंत्र कारवाई करून मोठ्या प्रमाणात तडजोड शुल्क वसूल करण्यात आले.

वाहतूक शाखेने सर्व पालकांना आवाहन केले आहे की आपल्या मुलांना अल्पवयीन अवस्थेत वाहन चालविण्यास देऊ नये, कारण अशा प्रकारांमुळे अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. तरुण वाहनधारकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत, तसेच वाहन चालविताना लायसन्स आणि वाहनाचे कागदपत्र जवळ बाळगावेत, अन्यथा पुढील कारवाई अपरिहार्य असेल, असेही पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले. ही मोहीम पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तर सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक जाधव, नागेश म्हात्रे आणि वाहतूक शाखेतील अंमलदारांच्या सहभागातून पार पडली.