
कुपवाड : औद्योगिक वसाहतीमधील कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ इंडस्ट्रीज अँड कॉमर्स आता स्पष्ट नियम, कायदेशीर कामकाज आणि पारदर्शक व्यवस्थेकडे वेगाने वाटचाल करत आहे. चेंबरचे प्रशासक व सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाचे निरीक्षक ज्ञा.शि. आंधळे यांनी गेल्या काही दिवसांत घेतलेल्या कारवाईमुळे परिसरात शिस्त आणि जबाबदारीची भावना निर्माण झाली आहे.
कृष्णा व्हॅली चेंबरची मूळ संस्था कायदेशीर मार्गाने, दस्तऐवजांच्या आधारे आणि सदस्यांच्या हितासाठी काम करते. या जागेचा उपयोग योग्य व्यवसाय, उद्योगविस्तार आणि सदस्यांच्या विकासासाठी व्हावा, हा चेंबरचा मुख्य हेतू आहे. प्रशासकांनी चेंबरची कागदपत्रे, जागेचा वापर आणि खाते तपासून पाहिले असता कोणत्याही कायदेशीर पद्धतीचा अवलंब न करता मोगसपणे भाडे करार केले असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. या अनधिकृत वापरामुळे संस्थेची प्रतिमा, नियम आणि सदस्यांचे हक्क बाधित होत होते.
या पार्श्वभूमीवर प्रशासक आंधळे यांनी नियमबाह्य जागा वापरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई सुरू केली. वीज कनेक्शन, भाडे आणि दस्तऐवजांची पूर्ण तपासणी करण्यात आली. या कारवाईमुळे इतर अनेक दुकानधारक व गाळेधारकांना देखील नियमांनुसार राहण्याचा चाप बसला असून, चेंबर परिसरातील एकूणच वातावरणात सकारात्मक बदल होण्यास सुरुवात झाली आहे.
कृष्णा व्हॅली क्लबने या कारवाईविरोधात न्यायालयात दावा दाखल केला होता, मात्र न्यायालयाने त्यांचा दावा आणि स्टे दोन्ही नाकारले. हा निर्णय चेंबरच्या कायदेशीर भूमिकेला पाठिंबा देणारा ठरला. त्यामुळे आता चेंबर परिसरातील सर्व जागांचा वापर फक्त अधिकृत आणि दस्तऐवजीकृत मार्गानेच होऊ शकणार आहे.
प्रशासक आंधळे यांनी सांगितले की, संस्था स्वच्छ, पारदर्शक आणि नियमबद्ध राहावी यासाठी आम्ही काम करत आहोत. अनधिकृत व्यवसायांमुळे चेंबरची हानी होत होती, ती थांबवण्यासाठी ही पावले उचलली आहेत.
या सर्व कारवाईमुळे कृष्णा व्हॅली चेंबरची सकारात्मक प्रतिमा दृढ होत असून, परिसरातील अधिकृत व्यवसायांना सुरक्षित, स्वच्छ आणि स्थिर वातावरण मिळणार आहे. आगामी काळात ही जागा योग्य उद्योग, व्यवसाय आणि सदस्यांच्या प्रगतीसाठी अधिक परिणामकारकपणे वापरली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.