
कोल्हापूर : महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) यांचे कोल्हापूर जिल्हा अधिवेशन कसबा बावडा येथील सतेज हॉल, दगडी चाळ येथे उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि संघर्षात्मक वातावरणात पार पडले. जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून आलेल्या सुमारे ७०० हून अधिक कंत्राटी वीज कामगारांच्या उपस्थितीमुळे अधिवेशनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
अधिवेशनाची सुरुवात प्रतीमापूजन, श्रमिक गीत आणि “भारतीय मजदूर संघ जिंदाबाद”च्या घोषणांनी झाली. संघटन, संघर्ष आणि संवाद या भारतीय मजदूर संघाच्या विचारधारेचा ठाम संदेश या अधिवेशनातून देण्यात आला.
संघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, वीज उद्योगातील कंत्राटी कामगार अनेक वर्षांपासून नियमित मंजूर रिक्त पदांवर काम करत आहेत. मात्र, तरीही त्यांना नोकरीतील स्थैर्य, समान वेतन आणि मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवले जात आहे.
कंत्राटदारविरहित थेट रोजगार, समान कार्य–समान वेतन, नोकरीत स्थैर्य व सामाजिक सुरक्षा या प्रमुख मागण्यांसाठी संघ कायदेशीर लढ्यासोबतच प्रसंगी रस्त्यावर उतरून संघर्ष करेल, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.

यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांचा परिचय करून प्रभावी प्रास्ताविक सादर करण्यात आले. अधिवेशनात कोल्हापूर जिल्ह्यातील कंत्राटी वीज कामगारांच्या वेतनवाढ, कामाचे तास, सुरक्षा साधने, पीएफ–ईएसआय, न्यायालयीन प्रकरणे आदी विविध प्रश्नांवर सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली.
संघटनात्मक बळकटीसाठी सदस्य नोंदणी व वर्गणी, न्यायालयीन प्रकरणांचा पाठपुरावा आणि आर्थिक व्यवहारातील पारदर्शकता याबाबत काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
अधिवेशनात दोन महत्त्वाचे ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. त्यामध्ये वीज उद्योगातील कंत्राटी कामगारांना कंत्राटदारविरहित थेट रोजगार देऊन नोकरीत स्थैर्य व संरक्षण द्यावे, तसेच “समान कार्य–समान वेतन” या तत्त्वानुसार वेतन, भत्ते व सर्व सेवा सुविधा लागू करून सामाजिक व आर्थिक न्याय सुनिश्चित करावा, या ठरावांचा समावेश होता. उपस्थित प्रतिनिधींनी या ठरावांना जोरदार पाठिंबा दिला.
यावेळी जिल्ह्याची नवीन संघटनात्मक कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. मिलिंद कुरतडकर यांची महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. पद म्हणजे सन्मान नसून कामगारांच्या हक्कांसाठीची जबाबदारी आहे, या भावनेने सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संघटित, निष्ठावान आणि संघर्षशील पद्धतीने कार्य करण्याची शपथ घेतली.
कार्यक्रमात प्रवीण जाधव (भारतीय मजदूर संघ, कोल्हापूर) यांनी अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन केले. अधिवेशनात राहुल भालबर, विजय कांबळे, अमोल भास्कर ,अनिल लांडगे, राजेंद्र ढाले, किरण माळी यांच्यासह जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांसाठी चहा, नाश्ता व भोजनाची व्यवस्था करण्यात आली. अधिवेशनात मंजूर झालेले ठराव व निर्णय संबंधित प्रशासन, वीज वितरण कंपन्या आणि शासनापर्यंत पोहोचवून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पुढील संघर्षाची दिशा ठरविण्यात येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.