
सांगली : जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रशासनाची सर्वांगीण तयारी पूर्ण झाली असून, मतदानापूर्वीचा शेवटचा टप्पा आता निर्णायक ठरणार आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक काकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, उरूण-ईश्वरपूर, विटा, आष्टा, तासगाव, जत, पलूस या 6 नगरपरिषदांसह शिराळा व आटपाडी या 2 नगरपंचायतींसाठी व्यापक प्रमाणावर कर्मचारी, अधिकारी व पोलीस यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील सर्व 8 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकूण 2,57,977 मतदार असून 291 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी 1,780 मतदान अधिकारी कर्मचारी, एफएसटी, एसएसटी व व्हीव्हीटी पथकांसाठी 371 कर्मचारी, तर आचारसंहिता, मीडिया सेल व इतर कामांसाठी 785 जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान शांततेत व सुरळीत पार पडावे यासाठी कठोर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
प्रत्येक नगरपरिषद व नगरपंचायतीतील मतदारसंख्येचा तपशील असा —
उरूण-ईश्वरपूर : 64,215 मतदार, विटा : 46,332, आष्टा : 30,573, तासगाव : 32,994, जत : 28,090, पलूस : 22,067, शिराळा : 13,095, तर आटपाडी : 20,611 मतदारांची नोंद आहे. पुरुष-स्त्री आणि तृतीयपंथी मतदारांच्या संख्येचीही वर्गवारी प्रशासनाने जाहीर केली असून मतदान तयारीचे सर्व घटक व्यवस्थितपणे अंतिम टप्प्यात आहेत.
मतदान केंद्रानुसार नियुक्त मनुष्यबळही मोठ्या प्रमाणात तैनात झाले आहे. उरूण-ईश्वरपूरमध्ये 67 मतदान केंद्रांसाठी 370 कर्मचारी, विटामध्ये 49 केंद्रांसाठी 295, आष्टामध्ये 37 केंद्रांसाठी 205, तासगावमध्ये 36 केंद्रांसाठी 230, जतमध्ये 34 केंद्रांसाठी 200, पलूसमध्ये 26 केंद्रांसाठी 200, शिराळा येथे 17 केंद्रांसाठी 105, तर आटपाडीत 25 केंद्रांसाठी 175 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या निवडणुकीत 8 नगराध्यक्ष व एकूण 181 नगरसेवकांची निवड होणार आहे. उरूण-ईश्वरपूरमध्ये 15 प्रभागांमधून 30 सदस्य, विटामध्ये 26 सदस्य (13 प्रभाग), आष्टा व तासगावमध्ये प्रत्येकी 24 सदस्य (12 प्रभाग), जतमध्ये 23 (11 प्रभाग), पलूसमध्ये 20 (10 प्रभाग), तर शिराळा व आटपाडी नगरपंचायतींमध्ये प्रत्येकी 17 सदस्यांची निवड होणार आहे.
प्रशासनाने मतदारांना आवाहन केले आहे की, शांतता, शिस्त आणि लोकशाहीच्या बळावर उभ्या असलेल्या या प्रक्रियेत सर्व नागरिकांनी सक्रीय सहभाग नोंदवावा आणि आपल्या मताचा हक्क निश्चितपणे बजावावा.