
सांगली : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार इद्रिस नायकवडी यांच्या वाहनावर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे. ही घटना चाबुकस्वारवाडी आणि लिमये मळा परिसरात घडली. आमदार नायकवडी हे माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांच्या गाडीत प्रवास करत होते, तर दुसऱ्या गाडीत त्यांचे सुरक्षारक्षक व कार्यकर्ते होते. दगडफेकीत त्यांच्या गाडीच्या मागील काचेला मोठे नुकसान झाले, मात्र कोणालाही जखम नाही.
घटनेच्या पार्श्वभूमीवर, आठ दिवसांपूर्वी आमदारांना धमकीचे पत्र मिळाले होते. त्यानंतर मिरज शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. पोलिसांना याबाबत संशयास्पद व्यक्तींची टेहळणी सुरु असल्याची माहिती देखील मिळाली आहे. पोलिस सध्या प्रकरणाची सखोल तपासणी करत आहेत.