
कोल्हापूर : कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतीमधील नवनवीन तंत्रज्ञान अवगत व्हावे, शेतीपूरक व्यवसायांचे मार्गदर्शन व्हावे यासह विविध प्रकारच्या कार्यशाळा आणि शिबिरांसाठी कृषी भवन उभारण्याची मागणी होत होती. आमदार अमल महाडिक यांनी २०१४ पासून सातत्याने यासाठी विविध स्तरावर पाठपुरावा सुरू ठेवला होता. या पाठपुराव्याला यश आले असून राज्य शासनाने कोल्हापुरातील शेंडा पार्क इथल्या कृषी विभागाच्या जागेवर कृषी भवन आणि अन्य इमारती उभारण्यासाठी ३५ कोटी ३१ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,अजितदादा पवार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. लवकरच याबाबतची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. या कृषी भावनामुळे कोल्हापूर सांगली आणि सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विविध कृषी विषयक सुविधा एकाच छताखाली मिळण्यास मदत होणार आहे. कृषी आणि कृषी पूरक व्यवसाय वाढीसाठी सरकारने उचललेले हे पाऊल सकारात्मक असून भविष्यात प्रगतशील शेतकरी घडवण्यास सहाय्यभूत ठरणारे आहे अशी भावना आमदार अमल महाडिक यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यांच्यासह नामदार चंद्रकांतदादा पाटील,माणिकराव कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शन आणि सहकार्यामुळे कृषी भवनाची उभारणी शक्य झाली असून या सर्वांचे आमदार महाडिक यांनी आभार मानले. गेल्या अनेक वर्षांपासून होत असलेल्या कृषी भवन उभारण्याच्या मागणीला यश आल्यामुळे कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.