
कोल्हापूर : कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या थेट पाईपलाईन योजनेमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्यामुळे कोल्हापूरवासियांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गणेशोत्सव काळात सलग पाच दिवस पाणीपुरवठा बंद राहिल्यामुळे संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले होते. वारंवार उद्भवणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या शिंगणापूर आणि नागदेववाडी पंपिंग स्टेशन मध्ये सुधारणा करण्याची गरज आमदार महाडिक यांनी व्यक्त केली होती. या दोन्ही पंपिंग स्टेशनमध्ये नवीन उपसा पंप बसवल्यास शहराला अखंडित पाणीपुरवठा करणे शक्य आहे ही बाब त्यांनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. या कामासाठी लागणारा निधी जिल्हा नियोजन समिती मधून देण्यात यावा अशी मागणीही आमदार अमल महाडिक यांनी पालकमंत्र्यांकडे केली होती.
नुकत्याच महापालिकेत पार पडलेल्या आढावा बैठकीतही या विषयावर चर्चा झाली. महापालिका प्रशासक के मंजूलक्ष्मी यांनी तातडीने प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला.कोल्हापूरकरांची गरज ओळखून पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी महापालिकेच्या प्रस्तावाला मंजुरी देत जिल्हा नियोजन समिती मधून नागदेव वाडी आणि शिंगणापूर पंपिंग स्टेशनमध्ये नवीन पंप बसवण्यासाठी ३ कोटी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
लवकरच हा निधी महापालिकेकडे वर्ग करून निविदा प्रक्रिया राबवली जाईल.
नागदेववाडी आणि शिंगणापूर पंपिंग स्टेशन पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यास कोल्हापूरकरांना मुबलक आणि सुरळीत पाणीपुरवठा होणार आहे. थेट पाईपलाईन मध्ये बिघाड झाल्यास या दोन्ही पंपिंग स्टेशन मधून होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे कोल्हापूर शहराला पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही.
आमदार अमल महाडिक म्हणाले..
” शिंगणापूर आणि नागदेववाडी पंपिंग स्टेशन साठी निधी मंजूर केल्याबद्दल पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक के मंजूलक्ष्मी यांचे मनःपूर्वक आभार. ही दोन्ही पंपिंग स्टेशन सुरू झाल्यानंतर कोल्हापूरकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागणार नाही याची खात्री आहे.”