दिवाळीपूर्वी मनपाची अतिक्रमणावर धडक कारवाई, ठोंबरे स्टोअरवर गुन्हा दाखल, विक्रेत्यांसाठी पर्यायी जागेची सोय

Share News

सांगली : दिवाळी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठांमध्ये वाढलेली गर्दी आणि वाहतुकीस होणारा अडथळा लक्षात घेऊन सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेने अतिक्रमणाविरोधात आज मोठी मोहीम राबवली. महापालिका आयुक्त तथा प्रशासक सत्यम गांधी यांच्या थेट आदेशानुसार सांगली मारुती रोड ते आरवडे हायस्कूल परिसरातील पदपथ आणि रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्यात आले.

कारवाईदरम्यान ठोंबरे चिरमुरे स्टोअर दुकानासमोर विनापरवाना आणि निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक जागेवर घालण्यात आलेला मंडप अतिक्रमण विभागाने तत्काळ काढून टाकला. काही दुकानदारांनी स्वतःहून अतिक्रमण हटवून प्रशासनाला सहकार्य केले. मात्र, कारवाईत अडथळा आणत अधिकाऱ्यांशी वाद घालून दमदाटी केल्याप्रकरणी ठोंबरे यांच्याविरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी स्पष्ट केले की दुकानासमोर केवळ दहा फुटांपर्यंतच मंडप लावण्याची परवानगी आहे. या नियमांचे उल्लंघन करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांवर यापुढे थेट कडक दंडात्मक आणि प्रशासकीय कारवाई केली जाणार आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर किरकोळ विक्रेत्यांसाठी तरुण भारत स्टेडियम, शिवनेरी हॉटेल ते आनंद टॉकीज मार्गे आरवाडे हायस्कूल आणि कृष्णामाई घाट या ठिकाणी पर्यायी जागेची सोय करण्यात आली आहे. विक्रेत्यांनी याच ठिकाणी विक्री करावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दत्तमारुती रोड ते बालाजी चौकापर्यंत कोणत्याही विक्रेत्याने रस्त्याच्या मध्यभागी बसू नये. हा रस्ता वाहतुकीसाठी रिकामा ठेवणे बंधनकारक आहे. तसेच रस्त्यावरील पट्ट्याच्या बाहेर कोणतेही टेबल, मंडप किंवा साहित्य ठेवले जाणार नाही. नियमांचे उल्लंघन झाल्यास साहित्य जप्त केले जाईल आणि मंडप तत्काळ हटवला जाईल.

ही कारवाई अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, सहाय्यक आयुक्त (क्षेत्रीय कार्यालय क्र. १) आकाश डोईफोडे, मुख्य स्वच्छता अधिकारी सचिन सागावकर, उप अभियंता महेश मदने, कनिष्ठ अभियंता ऋतुराज यादव, स्वच्छता निरीक्षक धनंजय कांबळे, प्रणिल माने, बांधकाम पर्यवेक्षक श्री. वादवणे, अतिक्रमण अधीक्षक तथा सहाय्यक आयुक्त (क्षेत्रीय कार्यालय क्र. २) नागार्जुन मद्रासी आणि अतिक्रमण विभागाच्या पथकाच्या उपस्थितीत यशस्वीपणे पार पडली.

वाहतुकीची सुव्यवस्था राखण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने अतिक्रमण हटवण्याचे आणि नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन सर्व विक्रेत्यांना केले आहे. नियमभंग करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करून कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही आयुक्तांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Icon Join Our WhatsApp Channel
error: Content is protected !!