
कोल्हापूर : शहर वाहतूक नियंत्रण शाखेतील दोन प्रामाणिक पोलिसांनी नागरिकांचा विश्वास अधिक वृद्धिंगत केला आहे. कोल्हापूर सीबीएस बसस्थानक परिसरात सापडलेली तब्बल १३ लाख रुपये किंमतीची ११ तोळे सोन्याची दागिने व रोख रक्कम ११०० रुपये असलेली पर्स मालकिणीच्या स्वाधीन करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, शहर वाहतूक शाखेतील पोहेकॉ धर्मेंद्र बगाडे व राजू पाटील हे नियमित कर्तव्यावर असताना दुपारी साडे दोनच्या सुमारास पर्स सापडली. पाहणी केली असता त्यात रोख रक्कम व सोन्याचे दागिने आढळले. पर्समधील आधारकार्डावरून मालकिणीची ओळख पटवण्यात आली. दरम्यान नातेवाईकांकडूनही हरविल्याची माहिती मिळाल्यानंतर जान्हवी प्रमोद वरेकर (रा. करक ता. राजापूर, रत्नागिरी) या महिलेची खात्री करून वस्तू परत करण्यात आली.


जान्हवी वरेकर या आपल्या आईच्या निधनानंतर कोल्हापूरात आल्या होत्या. पुण्याकडे परत जाताना सीबीएस बसस्थानकात पर्स रिक्षाजवळ पडली. नंतर पोलिसांनी ती शोधून सुरक्षित ठेवली. अखेर मा. पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अपर पोलीस अधीक्षक डॉ. धीरज कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील मॅडम, पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्या उपस्थितीत पर्स परत करण्यात आली.
श्रीमती जान्हवी वरेकर यांनी प्रामाणिक पोलिस धर्मेंद्र बगाडे व राजू पाटील यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. या घटनेमुळे कोल्हापूर ट्रॅफिक पोलिसांनी नागरिकांचा विश्वास जिंकला आहे.