
कोल्हापूर : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी महायुतीत जागावाटपावरून मोठा पेच निर्माण झाला आहे. अद्याप जागा वाटपाची औपचारिक चर्चा सुरूही झालेली नसताना महायुतीतील प्रत्येक घटक पक्षाने किमान ३० जागा हव्यात, अशी भूमिका घेतल्याने पेच अधिकच गंभीर झाला आहे. जनसुराज्य शक्ती पक्षाने आपली ताकद असलेल्या प्रभागांमध्ये स्वतंत्र उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्याने स्थिती आणखी गुंतागुंतीची झाली आहे. ८१ जागांसाठीची ही निवडणूक असताना महायुतीतील तिन्ही प्रमुख घटक पक्षांची एकत्रित मागणीच ९० पेक्षा अधिक जागांची आहे.
शिंदे गटाने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील यशाचा आधार घेत महापालिकेतही अधिक जागा मागितल्या आहेत. त्यांच्या वाट्याला एक खासदार, चार आमदार आणि पालकमंत्रिपदही असल्यामुळे त्यांच्या दाव्याला राजकीय बळ आहे. भाजपकडे एक राज्यसभा खासदार व तीन आमदार आहेत. भाजपचे नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तर कोल्हापूर महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्याची उघड घोषणा केली असून, “३३ पेक्षा कमी जागा आम्ही घेणार नाही,” अशी ठाम भूमिका मांडली आहे.
त्याच धर्तीवर शिंदे गटाच्या बैठकीतही ३३ पेक्षा कमी जागा न घेण्याचा सूर उमटला. उर्वरित जागा राष्ट्रवादी काँग्रेसला द्याव्यात, अशी चर्चाही सुरू झाली आहे. मात्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने यावर तात्काळ प्रतिक्रिया देत, अद्याप जागा वाटपावर कोणतीही बोलणी झाली नसल्याचे स्पष्ट केले. तरीही या पक्षानेही ३० पेक्षा कमी जागा घेणार नाही, अशी आपली भूमिका जाहीर केल्याने महायुतीतील अंतर्गत ताणतणाव वाढला आहे.
सर्वच पक्षांनी कोल्हापूर महापालिकेतील निवडणूक प्रतिष्ठेची मानल्याने, महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील लढतीआधीच महायुतीच्या घरातच जोरदार चुरस निर्माण झाली आहे.