
सांगली | प्रतिनिधी
सांगली शहरात गेल्या १६ वर्षांपासून प्रलंबित असलेला हॉकर्स – नो हॉकर्स झोनचा वाद अखेर निकाली लागला आहे. महापालिका प्रशासन आणि फेरीवाला समिती यांच्यात काल झालेल्या बैठकीत एकमताने ठराव करण्यात आला. या निर्णयामुळे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असून फेरीवाल्यांचेही पुनर्वसन निश्चित पद्धतीने होणार आहे.
महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या फेरीवाला समितीच्या बैठकीत ३० ठिकाणी हॉकर्स झोन निश्चित करण्यात आले, तर शहरातील महत्त्वाचे रस्ते नो हॉकर्स झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत. यामध्ये सांगली मध्यवर्ती बस स्थानक ते मिरज गांधी चौक, बस स्थानक ते सिव्हिल चौकमार्गे कर्मवीर भाऊराव पाटील चौक, राम मंदिर ते शंभरफुटी रस्ता व कोल्हापूर रस्ता ते वालचंद कॉलेज परिसराचा समावेश आहे.
पूर्वी महापालिकेने ६५ ठिकाणी नो हॉकर्स झोन प्रस्तावित केले होते, ज्यावर फेरीवाल्यांनी तीव्र विरोध केला होता. त्यांच्या नाराजीची दखल घेत प्रशासनाने संवादाचा मार्ग स्वीकारत सलग तीन बैठका घेऊन समन्वय साधला. अखेर शहरात वाहतुकीस अडथळा निर्माण न करता व फेरीवाल्यांचे हित जोपासणारा निर्णय घेतला गेला.
फेरीवाला समितीच्या बैठकीला अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपायुक्त स्मृती पाटील, पोलीस उपअधीक्षक विमला एम, तसेच फेरीवाला समितीचे सदस्य सुरेश टेंगले, कैल अलगूर, सादिक बागवान, निखिल सावंत, अमित मोतुगडे, बेबी मुल्ला, लता दुधाळ, रेखा पाटील, मुजीर जांभळीकर उपस्थित होते.
नो हॉकर्स झोन म्हणून घोषित रस्ते
- सांगली बस स्थानक – शिवाजी पुतळा – महापालिका – स्टेशन चौक – राम मंदिर – मिरज गांधी चौक
- सांगली बस स्थानक – सिव्हिल चौक – कर्मवीर भाऊराव पाटील चौक
- राम मंदिर – सिव्हिल हॉस्पिटल चौक – शंभरफुटी रस्ता
- आपटा पोलिस चौकी – कॉलेज कॉर्नर – पट्टणशेट्टी शोरूम
- शंभरफुटी रस्ता (कोल्हापूर रस्ता ते वालचंद कॉलेज)
- महापालिका – हरभट रोड – टिळक चौक
याठिकाणी लवकरच निर्णय होणार
कापडपेठ, गणपती पेठ आणि दत्त-मारुती रस्ता तूर्तास जैसे थे राहणार आहेत.
सांगली बस स्थानक परिसरात एस.टी. विभागाशी, सिव्हिल हॉस्पिटलजवळ सिव्हिल प्रशासनाशी, तसेच रिसाला रोडवरील हॉकर्स झोनसंदर्भात पोलीस प्रशासनाशी चर्चा करून महापालिका अंतिम निर्णय घेणार आहे.
हा निर्णय राबवताना सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय साधत शहराचा विकास आणि फेरीवाल्यांचे पुनर्वसन यांचा समतोल राखण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात असल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.