कागलमध्ये भव्य रक्तदान शिबीर यशस्वी, प्रशासन व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

Share News

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त साजऱ्या होणाऱ्या पंधरवड्याच्या पार्श्वभूमीवर, कागल तालुका प्रशासनाच्यावतीने दिनांक ९ जुलै २०२५ रोजी बहुउद्देशीय हॉल, कागल येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. तहसील कार्यालय, नगरपरिषद, पंचायत समिती, पोलीस स्टेशन, कृषी, आरोग्य व विविध विभागांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसह सामान्य नागरिकांनी या शिबिरात उत्स्फूर्त सहभाग घेतला.

शिबिराचे उद्घाटन प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, तहसीलदार अमरदीप वाकडे, डॉ. सरिता थोरात, डॉ. फारूक देसाई व पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या हस्ते करण्यात आले. या दिवशी संकलित रक्त छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (CPR), कोल्हापूर येथील रक्तपेढीकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. गरजू रुग्णांसाठी हे रक्त अत्यंत उपयोगी ठरणार असून, सर्व रक्तदात्यांची आवश्यक तपासण्या मोफत करण्यात येणार असल्याची माहिती गट विकास अधिकारी कुलदीप बोंगे व आरोग्य अधिकारी डॉ. देसाई यांनी दिली.

या उपक्रमात आरोग्य विभागातील डॉक्टर, सेवक-सेविका, तंत्रज्ञ, समुदाय आरोग्य अधिकारी आदींचा सक्रिय सहभाग होता. शिबिरामार्फत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवत एक सकारात्मक उदाहरण निर्माण करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Icon Join Our WhatsApp Channel
error: Content is protected !!