
मिरज : मिरजेच्या राजकारणाला नवी कलाटणी देणारी आणि अनेक समीकरणे बदलवणारी मोठी घडामोड आज घडली आहे. राजकारणातून समाजकारण करणारे म्हणून ओळख असलेल्या मोहन वनखंडे सर यांनी अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला.
वनखंडे सरांचा मोठ्या संख्येने चाहतावर्ग असून त्यांची कार्यशैली, सर्वसमावेशक बैठक आणि जनसंपर्क यामुळे त्यांच्या नावाभोवती एक वेगळीच चर्चा निर्माण झाली होती. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याच्या हालचालींना वेग आला होता. वरिष्ठ नेत्यांसोबत झालेल्या भेटीगाठींमुळे त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर शिक्कामोर्तब होईल असे चित्र होते. मात्र, अखेर त्यांनी शिवसेनेची निवड करत स्पष्ट संदेश दिला. माझी भूमिका स्पष्ट आणि भविष्यमुखी आहे.

या पक्षप्रवेशामुळे मिरजेतील शिवसेनेला मोठा बळकटीचा टॉनिक मिळाले आहे. विशेष म्हणजे भाजपसाठी हा धक्का असून, त्यांच्याकडील दमदार नेतृत्व शिवसेनेकडे वळत असल्याचे उदाहरण ठरले आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना प्रदेशपातळीवर आपली ताकद वाढवत असून, त्याचा थेट फायदा आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत होणार हे निश्चित आहे.
मोहन वनखंडेंच्या प्रवेशाने स्थानिक शिवसेना नेत्यांना नवा उत्साह मिळेल, तर दुसरीकडे इतर पक्षांच्या गणितांमध्ये उलथापालथ होण्याची शक्यता आहे. मिरजेतील धुरंधर नेत्यांना याचा फायदा होणार की तोटा, हे येणारा काळच ठरवेल मात्र, वनखंडेंच्या प्रवेशाने राजकीय चर्चांना अधिकच धार आली आहे, हे निश्चित.