
संजयनगर : सांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिकेच्या वतीने सुमारे दीडशे कोटी रुपयांच्या खर्चातून उभारण्यात येणारा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकातील भव्य २१ फूट उंच आणि साडेचारशे टन वजनाचा पुतळा गुरुवारी जल्लोषात शहरात दाखल झाला. क्रेनच्या सहाय्याने हा पुतळा अहिल्यानगर ते मिरज रोडमार्गे लक्ष्मीनगर-जुना कुपवाड रोड येथे नेण्यात आला. जय शिवाजी जय भवानी, जय अहिल्यादेवीच्या घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले. ढोल-ताशांच्या गजरात, गजनृत्य, भंडारा आणि आतषबाजीने मिरवणुकीत उत्साह ओसंडून वाहत होता. या सोहळ्यात मनगू आबा सरगर, खासदार विशाल पाटील, शेखर इनामदार, संतोष पाटील, रोहिणी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सायंकाळी आमदार जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांनी पुतळ्याची पाहणी केली. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा होणार असल्याची माहिती समितीने दिली.