
कुपवाड : देणघेणीतून उद्भवलेल्या मध्यरात्रीच्या हल्ल्यात मित्रावरच गावठी पिस्तुलाने गोळी झाडून जखमी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना एमआयडीसी कुपवाड पोलिसांनी अवघ्या चार तासांत अटक केली आहे. गुन्ह्यात वापरलेली तब्बल १५ लाखांची महिंद्रा थार गाडीही जप्त करण्यात आली आहे.
आज पहाटे सुतगिरणी चौकात रेकॉर्डवरील आरोपी राहुल सुभाष माने आणि गणेश सदाशिव खोत यांचा महेश उर्फ पिल्या पारछे याच्याशी पैशाच्या देणघेणीतून वाद झाला. वाद वाढताच गणेश खोत याने महेशला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली. त्यानंतर संतापलेल्या राहुल मानेने महेशवर गावठी पिस्तुलातून गोळी झाडली. गोळी महेशच्या मांडीला लागून तो गंभीर जखमी झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे यांनी दोन विशेष पथके तयार करण्याचे आदेश दिले.
पीएसआय अमोल घोरात, पोहेकॉ. संदीप पाटील, गजानन जाधव, निलेश कोळेकर, कुलदीप माने, अविनाश पाटील, प्रविण मोहिते, मधुकर सरगर, संदीप घस्ते, सुरेखा आकळे आणि चालक चंद्रकांत खोबरखेडे यांच्या संयुक्त कारवाईत तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली.
फक्त चार तासांत आरोपी राहुल सुभाष माने (रा. संकल्पनगर, बामनोळी, कुपवाड) आणि गणेश सदाशिव खोत (रा. शांत कॉलनी, कुपवाड) यांना ताब्यात घेतले. गुन्ह्यात वापरलेली महिंद्रा थार गाडीही जप्त करण्यात आली आहे.
जखमी महेश पारछे हा देखील रेकॉर्डवरील आरोपी असून गुन्ह्यातील तिघांवर खून, खुनाचा प्रयत्न आणि इतर गंभीर कलमांन्वये गुन्हे दाखल आहेत. पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.