
सांगली : महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १४ मध्ये मूलभूत सुविधा सुधारण्यासाठी मंजूर झालेल्या ४० लाखांच्या विकासकामांचे लोकार्पण आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले. नगरविकास योजनेअंतर्गत मिळालेल्या या निधीतून रस्ते, निचरा व्यवस्था आणि परिसरातील इतर महत्त्वाच्या गरजांना बळकटी मिळणार आहे.
या कामांत एस.टी. स्टॅण्ड ते गरवारे कॉलेज मार्गाचा रस्ता, मारुती चौक येथील सी.डी. वर्कद्वारे पावसाच्या पाण्याचा निचरा सुधारणा आणि विवेकानंद मंडळ ते सतीश पवार घर ते सरकारी घाट रस्ता तसेच जोशी गल्ली गावभाग रस्ता सुधारणा यांचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे प्रभागातील वाहतूक सुधारेल, पावसाळ्यातील अडचणी कमी होतील आणि नागरिकांना सुरक्षित, व्यवस्थित सुविधा मिळतील, असे सांगण्यात आले.
लोकार्पण कार्यक्रमाला भाजपा राज्य परिषद सदस्य प्रकाश बिरजे, माजी नगरसेविका भारती दिगडे, उर्मिला बेलवलकर, सुबराव मद्रासी, युवराज बावडेकर, रणजीत सावर्डेकर, केदार खाडिलकर, विजय साळुंखे यांसह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभागातील विकासकामांना वेग येत असल्याचा आनंद उपस्थितांनी व्यक्त केला.