
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेशी संबंधित विविध विषयांवर आमदार अमल महाडिक यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी प्रामुख्याने कोल्हापूर शहरातील कचरा उठाव, सांडपाणी व्यवस्थापन, रस्ते, स्मशानभूमी, उद्याने अशा विविध विषयांवर चर्चा केली.
कोल्हापूर शहरात दररोज संकलित होणाऱ्या कचऱ्यावर कसबा बावडा इथल्या झूम प्रकल्पामध्ये प्रक्रिया केली जाते. पण शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता आणखी प्रक्रिया केंद्रांची उभारणी करण्याची गरज आहे. याबाबत अधिकाऱ्यांनी शहरालगत असणाऱ्या ग्रामीण भागाशी समन्वय साधत किमान दोन ठिकाणी कचरा प्रक्रिया केंद्र उभारण्यासंदर्भात जागेची पाहणी करावी अशा सूचना आमदार महाडिक यांनी दिल्या. कचरा उठावासाठी टिप्पर खरेदी करण्याच्या प्रस्तावाबाबतही त्यांनी विचारणा केली. झूम प्रकल्पावर सुरू करण्यात आलेल्या बायोगॅस निर्मिती प्रकल्पस्थळी सीएनजी पंप उभारण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करावा. शासनाकडून खास बाब म्हणून यासाठी निधी उपलब्ध केला जाईल अशी ग्वाही आमदार महाडिक यांनी दिली. कोल्हापूर शहरातील रस्ते दर्जेदार होण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासणी करावी आणि ठेकेदाराला सूचना कराव्यात. संपूर्ण शहर खड्डेमुक्त करण्यासाठी डेडलाईन ठरवावी असे निर्णय आमदार महाडिक यांनी दिले. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूरला महालक्ष्मी मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून मोठा निधी देण्यात येणार आहे. त्याच धर्तीवर कोल्हापूर शहरातील नवदुर्गा मंदिरांच्या सुशोभीकरणासाठी स्वतंत्र प्रस्ताव तयार करून शासनाला सादर करावा असेही आमदार महाडिक यांनी सांगितले. शहरात येणारे पर्यटक आणि भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून शहरात ठीक ठिकाणी सार्वजनिक शौचालयांची उभारणी लवकरात लवकर करावी. शहरातील ड्रेनेज लाईनची स्वच्छता करण्यासाठी नवीन मशनरी खरेदी करण्यासंदर्भात प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावा, जिल्हा नियोजन मधून निधीची तरतूद केली जाईल. त्याचबरोबर शहरातील उद्यानांचे सुशोभीकरण करण्यासाठी लोकसहभागाबरोबरच विविध कंपन्यांना सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात आवाहन करावे. त्या संदर्भात उद्योजकांसमवेत लवकरच बैठक घेण्याची ग्वाही आमदारांनी दिली. कोल्हापूर महानगरपालिकेत वर्षानुवर्ष कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती संदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश आमदार महाडिक यांनी दिले. फुलेवाडी इथल्या फायर स्टेशन इमारतीच्या बांधकामाचे पुढे काय झाले? काम रेंगाळू देऊ नका अशा स्पष्ट सूचना महाडिक यांनी दिल्या.

कोल्हापूर महानगरपालिकेच्या नूतन इमारतीसाठी जागा मिळवण्यात यश आल्याबद्दल प्रशासक के मंजूलक्ष्मी आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले. नवीन प्रशासकीय इमारत पर्यावरण पूरक आणि प्रशस्त व्हावी यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही महाडिक यांनी दिली. कोल्हापूर शहरातील झोपडपट्ट्यांचे SRA अंतर्गत पुनर्वसन, पुनर्बांधणी आणि विकासासंदर्भात म्हाडा आणि महानगरपालिकेची संयुक्त बैठक घेऊन आराखडा बनवण्याच्या सूचना आमदार महाडिक यांनी दिल्या. कोल्हापूर शहराच्या उपनगरामध्ये रिंग रोडलगत नवीन हॉस्पिटल उभारणे, शहरातील बस स्टॉपचे सुशोभीकरण करणे, शहरामध्ये दिशादर्शक फलक उभारणे, कोल्हापुरातील मुख्य रस्त्यांवर वाहतुकीला अडथळा ठरणारे विजेचे खांब हटवणे यासह अन्य विषयांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश आमदार महाडिक यांनी दिले. भविष्यातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता कोल्हापूर स्मशानभूमीचे विस्तारीकरण करणे आवश्यक आहे. त्यासाठी आराखडा तयार करावा, निधीसाठी प्रस्ताव सादर करावा असेही आमदार महाडिक यांनी सांगितले.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी नवीन घरे उपलब्ध करण्या संदर्भात सविस्तर प्रस्ताव सादर करावा असेही आमदारांनी नमूद केले. कोल्हापूर शहराच्या विकासासाठी मी व कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर एकत्रित प्रयत्न करत असून खासदार धनंजय महाडिक,पालकमंत्री प्रकाश आबिटकर, सहपालकमंत्री माधुरीताई मिसाळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यांच्या माध्यमातून निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही आमदार अमल महाडिक यांनी दिली.
या बैठकीदरम्यान शहरातील विविध नागरिकांच्या समस्या आमदार अमल महाडिक यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या. नागरिकांच्या प्रश्नांची तात्काळ निर्गत करावी असे निर्देशही आमदार अमल महाडिक यांनी दिले. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजीत घाटगे यांच्यासह महानगरपालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे
- आणखी २ घनकचरा व्यवस्थापन आणि प्रक्रिया केंद्रांची उभारणी
- शुभ प्रकल्प येथे उभारण्यात आलेल्या बायोगॅस निर्मिती केंद्रावर सीएनजी पंप उभारणे
- कोल्हापूर शहरातील रस्ते खड्डे मुक्त करण्यासाठी डेडलाईन ठरवणे
- कोल्हापुरातील नवदुर्गा मंदिरांच्या सुशोभीकरणासाठी स्वतंत्र प्रस्ताव तयार करणे
- शहरात ठीक ठिकाणी सार्वजनिक शौचालयांची उभारणी करणे
- ड्रेनेज लाईनची स्वच्छता करण्यासाठी अत्याधुनिक मशीनरी खरेदी करण्यासंदर्भात जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव सादर करणे
- उद्यानांच्या सुशोभीकरणासाठी लोकसहभाग आणि विविध कंपन्यांच्या सीएसआर फंडातून निधीसाठी आवाहन करणे
- फुलेवाडी येथील फायर स्टेशनचे काम तातडीने पूर्ण करणे
- कोल्हापूर शहरातील झोपडपट्ट्यांच्या विकासासंदर्भात म्हाडा सोबत संयुक्त बैठक घेणे
- उपनगरांमध्ये रिंग रोडलगत नवे हॉस्पिटल उभारणे
- कोल्हापूर स्मशानभूमीचे विस्तारीकरण आणि
- कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी नवी निवासस्थाने बांधणे
- शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणारे खांब हटवणे, दिशादर्शक फलक उभारणे, बस स्टॉप चे सुशोभीकरण करणे