
सांगली : जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये अर्ज माघारीनंतरचे अंतिम चित्र अत्यंत रंगतदार आणि गुंतागुंतीचे बनले आहे. एकीकडे विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी सरळ लढत पाहायला मिळाली होती; परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मात्र आघाड्यांची समीकरणे पूर्णपणे ढासळली असून पारंपरिक प्रतिस्पर्धी पुन्हा आमने-सामने आले आहेत. अनेक ठिकाणी अंतर्गत नाराजी, बंडखोरी, ‘शेवटच्या मिनिटातील मनधरणी’ आणि स्थानिक स्तरावरील वैयक्तिक वर्चस्वामुळे पक्षसमीकरणांपेक्षा व्यक्तीगत प्रतिष्ठेच्या चुरशीची लढत निर्माण झाली आहे.
जिल्ह्यातील ईश्वरपूर, आष्टा, तासगाव, विटा, जत, पलूस या सहा नगरपरिषदांसह शिराळा आणि आटपाडी या दोन नगरपंचायतींसाठी 375 अर्ज माघारी घेण्यात आले. यानंतर नगराध्यक्षपदासाठी 41 तर नगरसेवकपदांसाठी 594 उमेदवार रिंगणात कायम राहिले आहेत. सुरुवातीला दाखल झालेल्या 1,678 अर्जांपैकी 518 अर्ज अवैध ठरले होते. त्यामुळे संपूर्ण निवडणुकीवर ‘छाननी ते माघारी’ असा नाट्यमय प्रवास पहायला मिळाला.
कोणत्या नगरपरिषदेत कशी लढत?
अर्ज माघारीनंतर निवडणुकीचे स्पष्ट झालेले गणित असे —
ईश्वरपूर, आष्टा, शिराळा : स्पष्ट दुरंगी लढत
विटा, आटपाडी, पलूस : तुफानी तिरंगी लढत
जत आणि तासगाव : अनेक दावेदारांसह चौरंगी आणि गुंतागुंतीचे समीकरण
महायुती–महाविकास आघाडीचे गुंते वाढले
निवडणुकीत अपेक्षित असलेले सरळ महायुती विरुद्ध महाविकास आघाडीचे चित्र प्रत्यक्षात फार कमी ठिकाणी दिसले. उलट —
काही ठिकाणी मित्रपक्षच एकमेकांच्या विरोधात उभे राहिले
काही ठिकाणी स्थानिक नेत्यांच्या नाराजीतून बंडखोरी पेटली
तर काही भागात युतीची भूमिका अस्पष्ट राहिली
महत्त्वाचे राजकीय क्षणचित्र
▪️ शिराळा : आमदार सत्यजित देशमुख यांच्या विरोधात दोन नाईक गटांची एकत्रित मोर्चेबांधणी.
▪️ ईश्वरपूर : आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात सर्वच स्थानिक विरोधक एकत्र.
▪️ आष्टा : पारंपरिक प्रतिस्पर्धी पुन्हा समोरासमोर; आघाड्यांची गणिते कलंडली.
▪️ पलूस : आमदार विश्वजित कदम यांच्या विरोधात
- माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांचा भाजप गट,
- राष्ट्रवादी अजित पवार गट,
- शिंदे गट — अशी तिरंगी झुंज.
▪️ विटा : आमदार सुहास बाबर विरुद्ध माजी आमदार सदाशिवराव पाटील —
पारंपरिक संघर्षाला यंदा अजित पवार गटामुळे तीन तोंडी स्वरूप.
▪️ तासगाव : राष्ट्रवादी (शरद पवार), स्वाभिमानी आघाडी, भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार) —
एकूण चौरंगी आणि धुरळा उडवणारी लढत.
▪️ जत : माजी आमदार विक्रम सावंत यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी तर
विरोधात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप.
शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित गट)ही स्वतंत्रपणे रिंगणात —
बहुकोनी निवडणूक.
अपक्षांचे ‘कडवे’ समीकरण
अनेक ठिकाणी अपक्षांनी अर्ज मागे न घेता मैदानात राहण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक पातळीवर एक-एक मत निर्णायक ठरत असल्यामुळे —
अपक्ष कोणाचे मत मोडतील?
कोणाच्या मतांवर ‘स्लिट’ इफेक्ट होईल?
कोणत्या पक्षाला ‘किंगमेकर’ अपक्षांची साथ मिळेल?
यावर सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.
प्रचाराचा धुरळा आजपासून उसळणार
चित्र स्पष्ट झाल्यानंतर आता राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.
घराघरात प्रचार, वॉर्डनिहाय समीकरणे, बंडखोरांची भूमिका आणि अपक्षांचा प्रभाव —
पुढील आठवडा जिल्ह्यातील निवडणूक राजकारणात अत्यंत निर्णायक ठरणार आहे.