
कागल : कागल तालुक्यातील रणदिवेवाडी येथील श्री राजर्षी शाहू ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेमध्ये ठेवलेली ठेव रक्कम परत मिळावी या मागणीसाठी विनायक अशोक चिखले व त्यांच्या आई श्रीमती शालन अशोक चिखले यांनी कागल येथील तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
चिखले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले की, शालन चिखले यांनी काबाडकष्ट करून शेतमजुरी व उसाच्या बिलातून पैसा साठवून ठेवला होता. गावात बँकेची सुविधा नसल्याने ही रक्कम सुरुवातीला कसबा सांगाव येथील बँकेत ठेवली होती. नंतर पतसंस्थेच्या सचिवाने विश्वास देऊन ही रक्कम संस्थेत मुदतठेव म्हणून ठेवण्यास प्रवृत्त केले.
मात्र मुदतपूर्तीनंतर रक्कम परत मागितली असता टाळाटाळ करण्यात आली. याप्रकरणी २९ नोव्हेंबर २०२२ रोजी मोठ्या अपहाराबाबत तक्रार देऊन गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. तरीही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.
१५ मार्चपर्यंत ठेव रक्कम परत मिळावी, अशी लेखी मागणी करूनही प्रतिसाद न मिळाल्याने १८ मार्चपासून चिखले कुटुंबीयांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
यावेळी सुनील पाटील, परशराम खाडे, शैलेश चिखले, सुकुमार शिंदे, नंदकुमार पाटील, संतोष शिंदे, रोहित पाटील, अनंत खोत, प्रणव लोले, सुरेश पाटील आदी उपस्थित होते.