
सांगली : वाळवा तालुक्यात आज दुपारनंतर वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने वातावरणात अचानक बदल झाला. गेल्या चार ते पाच दिवसांपासून वाढलेल्या उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिक हैराण झाले होते. तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने दुपारी रस्तेही ओस पडत होते. सायंकाळी चारच्या सुमारास काळे ढग दाटून आले आणि वाऱ्याचा वेग वाढताच पावसाला सुरुवात झाली. काही भागांत मध्यम ते जोरदार सरी कोसळल्या. या पावसामुळे तापमानात घट होऊन परिसरात गारवा निर्माण झाला. उकाड्याने त्रस्त नागरिकांनी या बदलाचे स्वागत केले. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी किरकोळ नुकसान झाल्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यात 20 ते 22 एप्रिलदरम्यान पुन्हा वादळी पावसाचा इशारा देण्यात आला असून मुख्यमंत्री कार्यालयाने नागरिक व शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.