
पोटनिवडणूक प्रचारासाठी सुपा, सोमेश्वर येथे प्रचारसभा
बारामती : बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी पवार यांना इतके प्रचंड मताधिक्य द्या की उच्चांकी मताधिक्याचा तो देशात विक्रम झाला पाहिजे, असे भावनिक आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. श्रीमती सुनेत्रावहिनी यांना मिळालेले देशातील उच्चांकी मताधिक्य हीच स्वर्गीय अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही ते पुढे म्हणाले.
बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकी प्रचारामध्ये सुपा, सोमेश्वर येथील जाहीर सभांमधून मंत्री हसन मुश्रीफ बोलत होते.
यावेळी भाषणात पुढे बोलताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करण्यासाठी मी या पवित्र आणि महान भूमीत पोहोचलेलो आहे. स्वर्गीय अजितदादा निवडणुकीचा फॉर्म भरायचे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी फिरत राहायचे. त्यानंतर प्रचार समारोपाच्या शेवटच्या दिवशी शेवटच्या सभेलाच ते बारामतीत पोहोचायचे. तुम्ही बहाद्दर कार्यकर्ते आणि जनतेने सदैव त्यांना एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य दिले आहे. दोनवेळा तर तुम्ही मताधिक्याच्या उच्चांकाचा देशातच विक्रम केला. अशा स्वर्गीय अजितदादा पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या जनता आणि कार्यकर्त्यांना आम्ही काय सांगायच? स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या पश्चात श्रीमती सुनेत्रावहिनी पवार, पार्थ पवार, जय पवार या कुटुंबीयांच्या पाठीशी आपण सर्वजण हिमालयाप्रमाणे राहा. या कुटुंबाचे जीवापाड संरक्षण करा, असे आवाहनही त्यांनी केले.
मंत्री मुश्रीफ म्णाले, स्वर्गीय लोकनेते अजितदादा पवार यांच्या पश्चात उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार या विक्रमी मताधिक्याने येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. परंतु; समोर कोणी उमेदवार नाही त्यामुळे इर्षा नाही. त्यामुळे मरगळ येऊ व गाफील राहू नये. त्यामुळे स्वर्गीय अजितदादांच्या पश्चात बारामतीला जावं आणि तुमच्याशी संवाद साधावा, ही भावना आम्हाला स्वस्थ बसू देत नव्हती. या भावनेपोटीच येऊन आम्ही तुम्हा सर्वांचे दर्शन घेतले.

बारामतीच्या विकासाचा लौकिक……!
मंत्री मुश्रीफ म्हणाले बारामतीच्या विकासाचा लौकिक सर्वदूर आहे. मी माझ्या सात निवडणुकीच्या प्रचारामध्ये प्रत्येक सभेमधून हे सांगत आलो की, “मला निवडून द्या, मी बारामती करून दाखवतो”. एवढा प्रचंड विकास बारामती मतदारसंघाचा झालेला आहे.
बारामती तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन विक्रमआप्पा भोसले, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप, कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर आदी प्रमुखांसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.