‘गोकुळ’ची ५ वर्षे संकल्पपूर्तीची, विश्वास वृद्धिंगत करणारी,उलाढाल ४१०० कोटींवर; उच्चांकी दूध दरवाढीसह, २० लाख लिटर संकलनाचा टप्पा पार, गुंतवणुकीतही लक्षणीय वाढ; नविद मुश्रीफ,चेअरमन, गोकुळ दूध संघ

Share News

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लि. (गोकुळ) च्यावतीने संघाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत गेल्या पाच वर्षांतील संघाच्या सर्वांगीण प्रगतीचा सविस्तर आढावा सादर करण्यात आला. राज्य व जिल्ह्यातील नेतृत्वाचे मार्गदर्शन, लाखो दूध उत्पादक शेतकरी, दूध संस्था, कर्मचारी, वितरक, वाहतूकदार व प्रसार माध्यमांचे सहकार्य यामुळे गोकुळने दूध उत्पादकांच्या हिताचे अनेक दूरदृष्टी पूर्ण निर्णय प्रभावीपणे राबवले असल्याचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी सांगितले.

      गेल्या पाच वर्षांत गोकुळने दूध खरेदी दरामध्ये ऐतिहासिक वाढ केली आहे. सन २०२०-२१ साली म्हैशीच्या दुधासाठी ६.० फॅट व ९.० एस.एन.एफ.प्रमाणात करिता रुपये ३९ प्रतिलिटर असलेला दूध खरेदी दर वाढून रुपये ५३.५० प्रतिलिटर करण्यात आला आहे. तसेच गायीच्या दुधासाठी ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ. प्रमाणात करिता रुपये २६ प्रतिलिटर असलेला दूध खरेदी दर वाढून रुपये ३६ प्रतिलिटर करण्यात आला आहे. म्हणजेच अनुक्रमे रु. १४ व रु. १० प्रतिलिटर दरवाढ देण्यात आली असून ही दरवाढ संघाच्या इतिहासातील उच्चांकी मानली जाते. या निर्णयामुळे जिल्ह्यातील लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.

      संघाच्या आर्थिक प्रगतीतही मोठी झेप दिसून येते. सन २०२०-२१ मध्ये सुमारे रु. २५५१ कोटी इतकी असलेली वार्षिक उलाढाल सन २०२५-२६ मध्ये वाढून रु. ४१०० कोटींवर पोहोचली आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल रु.१५४९ कोटींची वाढ नोंदवण्यात आली आहे. तसेच संघाच्या गुंतवणुकीतही लक्षणीय वाढ झाली आहे. सन २०२०-२१ मध्ये रु. ३२२ कोटी असलेली गुंतवणूक सध्या वाढून रु. ५९४ कोटींवर पोहोचली असून यात तब्बल रु. २७२ कोटींची वाढ झाली आहे. या वाढीमुळे संघाची आर्थिक घडी अधिक मजबूत झाली असून दूध उत्पादकांना अधिक चांगला दर देण्याची क्षमता वाढली आहे.

      दूध संकलनाच्या बाबतीत गोकुळने लक्षणीय प्रगती केली आहे. सध्या दूध संस्थांमार्फत साडेपाच लाखांहून अधिक दूध उत्पादक संघाशी जोडले गेले आहेत. सन २०२०-२१ मध्ये प्रतिदिन सरासरी १२ लाख २२ हजार लिटर असलेले दूध संकलन वाढून सन २०२५-२६ मध्ये १६ लाख २० हजार लिटरवर पोहोचले आहे. याशिवाय अलीकडील काळात २० लाख लिटर संकलनाचा टप्पाही यशस्वीरित्या पार करण्यात आला आहे. दूध विक्रीतही सातत्याने वाढ होत असून ११ लाख ४२ हजार लिटरवरून १५ लाख ५६ हजार लिटरपर्यंत वाढ झाली आहे. रमजान ईदच्या दिवशी २५.४१ लाख लिटर विक्रीचा उच्चांक नोंदवण्यात आला.

      गोकुळने दर्जेदार उत्पादनांच्या जोरावर ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. ग्राहकांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन बासुंदी, फ्लेवर्ड मिल्क, टेट्रा पॅक मँगो लस्सी, मसाले ताक, कोल्हापुरी पेढा, चीज, गुलाबजाम तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित गोकुळ आईस्क्रीम यांसारखी नवीन उत्पादने बाजारात आणण्यात आली आहेत. पुणे व मुंबई बाजारपेठेत विक्रीत वाढ झाली.

      दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यात आल्या आहेत. जातिवंत म्हैस खरेदीसाठी रु. ५०,००० अनुदान, वासरू संगोपन, वैरण व बियाणे अनुदान, इमारत अनुदानात वाढ, पशुखाद्य अनुदान तसेच संस्था व्यवस्थापन खर्चात वाढ देण्यात आली आहे. सचिव कमिशनमध्ये प्रति लिटर १० पैशांची वाढ व संस्था हाताळणी खर्चात प्रति लिटर २० पैशांची वाढ करण्यात आली आहे. तसेच मिल्क टेस्टर व मिल्क अनालायझर मशिन बायबॅक योजना राबवून संस्थांना आधुनिक साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

      महिला दूध उत्पादकांसाठी ‘नारी सन्मान’ विमा योजना राबवण्यात आली असून या योजनेअंतर्गत रु. २ लाखांचे विमा संरक्षण उपलब्ध आहे. वार्षिक रु.१५० प्रीमियमपैकी ३० टक्के रक्कम संघाकडून अनुदान म्हणून दिली जाते. तसेच बायोगॅस योजना व हवामानावर आधारित पॅरामेट्रिक विमा योजना राबवून महिलांना आर्थिक व सामाजिक सुरक्षितता प्रदान करण्यात आली आहे.

      गोकुळने विविध प्रकल्पांच्या माध्यमातून खर्चात मोठी बचत साधली आहे. नवी मुंबई (वाशी) येथील दुग्धशाळा विस्तार व आधुनिकीकरणामुळे दरवर्षी सुमारे रु.१२ कोटी पॅकिंग खर्चाची बचत होत आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे उभारलेल्या ६.५ मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पामुळे दरवर्षी रु. ६ कोटी वीज खर्चात बचत होत आहे. वाशी येथील दही प्रकल्पामुळे सुमारे रु. ३.५० कोटींची बचत होत आहे. तसेच मुडशिंगी पशुखाद्य कारखान्यातील ३२५ केडब्ल्यू सौर प्रकल्पातून दरवर्षी रु ४० लाख बचत होत आहे. बिद्री (बोरवडे) चिलिंग सेंटर रेफ्रिजरेशन विस्तारामुळे रु.२६ लाख बचत व दूध हाताळणी क्षमतेत वाढ झाली आहे, तर वाशीतील रेफ्रिजरेशन अपग्रेडेशनमुळे रु. ६० लाखांची बचत होत आहे. संघाच्या स्वमालकीच्या पेट्रोल पंप प्रकल्पातून एप्रिल २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत रु. ९७.३२ लाखांचा नफा मिळाला असून BPCL कडून सन्मानही प्राप्त झाला आहे.

      पशुखाद्य व पशुपूरक योजनांमुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. ‘महालक्ष्मी कोहिनूर डायमंड’ पशुखाद्य, हर्बल पशुपूरक प्रकल्प, मोफत फर्टीमिन प्लस योजना, ‘महालक्ष्मी प्रेग्नन्सी रेशन’ यांसारख्या उपक्रमांद्वारे जनावरांच्या आरोग्यात सुधारणा झाली आहे. हर्बल प्रकल्पांतर्गत १ लाख ५६ हजार जनावरांवर उपचार करून रु. १.३० कोटींची औषधे मोफत देण्यात आली आहेत. फर्टीमिन प्लस योजनेतून रु.१६ ते १७ कोटी अनुदान देण्यात आले आहे. तसेच पशुखाद्य दरात प्रति पोते रु. ५० अनुदान देऊन रु. ५.६३ कोटींचा लाभ देण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील दूध उत्पादकांना जातिवंत जनावरे उपलब्ध करून देण्यासाठी केर्ली ता.करवीर व लिंगनूर ता.गडहिंग्लज येथे जातिवंत म्हैस विक्री केंद्र उभारण्यात आले आहेत.

      कार्बन क्रेडीट बायोगॅस योजनेअंतर्गत ७,८९१ बायोगॅस युनिट्स कार्यान्वित करण्यात आले असून रु.२६.२२ कोटींचे अनुदान दूध उत्पादकांना वितरित करण्यात आले आहे. तसेच हवामानातील बदलामुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी न्यू इंडिया एश्योरन्स कंपनीमार्फत पॅरामेट्रिक विमा योजना राबवण्यात आली असून प्रती जनावर रु.२३६ प्रीमियममध्ये वार्षिक रु.२० हजारांचे संरक्षण दिले जात आहे.

      भविष्यातील योजनांमध्ये ग्राहकांच्या आवडीनुसार सिताफळ, अंजीर व गुलकंद बासुंदी तसेच आईस्क्रीमचे नवीन प्रकार बाजारात आणण्याचा मानस आहे. नवी मुंबई (वाशी) व पुणे येथे विस्तार, हायस्पीड पॅकिंग मशिन, शिरोळ सॅटेलाईट डेअरीचे आधुनिकीकरण, CNG पंप व इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारणी, ‘आयडीयल TMR’ (मिश्रित चारा) उत्पादन तसेच राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत ५०० जनावरांचे संगोपन केंद्र सुरू करण्याचे नियोजन आहे. आयव्हीएफ व सेक्स सिमेन तंत्रज्ञानाद्वारे उच्च वंशावळ जनावरांची पैदास करण्यावरही भर दिला जाणार आहे.

      गेल्या ६३ वर्षांच्या परंपरेत गोकुळने सहकाराच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यात धवल क्रांतीची गौरवशाली वाटचाल घडवली आहे. दूध उत्पादक, दूध संस्था, संघ कर्मचारी, अधिकारी, ग्राहक, वितरक तसेच सर्व घटकांना न्याय देण्याची भूमिका सर्व संचालक मंडळानी घेतली असून गेल्या पाच वर्षांतील निर्णयांमुळे दूध उत्पादकांचा थेट आर्थिक फायदा, उत्पादनाची गुणवत्ता, खर्चातील बचत आणि बाजारपेठेतील गोकुळची प्रतिमा अधिक मजबूत झाली आहे. भविष्यातही दूध उत्पादकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून संघाची प्रगती अधिक वेगाने पुढे नेण्याचा निर्धार संचालक मंडळाने व्यक्त केला आहे.

यावेळी संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्‍ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, चेतन नरके, युवराज पाटील, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Icon Join Our WhatsApp Channel
error: Content is protected !!