महावितरणचा वीज कंत्राटी कामगारांना आर्थिक दिलासा

Share News

दिल्ली : महावितरण कंपनीने वीज कंत्राटी कामगारांना पूर्वीप्रमाणेच बोनस व रजेचे वेतन दरमहा अदा करण्याचा निर्णय परिपत्रक काढून घेतला. ही बाब राज्यातील महावितरण, महापारेषण व महानिर्मीती मधील वीज कंत्राटी कामगारांसाठी मोठा आर्थिक दिलासा देणारी असून महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने( संलग्न भारतीय मजदूर संघ ) या निर्णयाचे स्वागत केले आहे.

महावितरणच्या औद्योगिक संबंध विभागाने दि.२१ एप्रिल २०२६ रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार नोव्हेंबर २०२५ ते ऑक्टोबर २०२६ या कालावधीतील बोनस व रजेचे वेतन एकत्रितरित्या ऑक्टोबर २०२६ महिन्यात देण्याची पद्धत लागू करण्यात आली होती. मात्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) व सामाजिक सुरक्षा संहिता २०२० अंतर्गत निर्धारित वेतन मर्यादा रकमेच्या व्याख्येत बदल झाल्यामुळे आता पुन्हा वीज कंत्राटी कामगारांना दरमहा वेतनात बोनस व रजेचे वेतन समाविष्ट करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश व महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने या बाबत प्रशासन,केंद्र सरकार, राज्य सरकार व ई.एस.आय कडे मागणी केली होती. तसेच नोव्हेंबर २०२५ मध्ये केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवीय यांच्या समवेत दिल्ली येथे झालेल्या बैठकीत सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी ESIC वेतन मर्यादा वाढवणे बाबत आग्रही मागणी केली होती .

नोव्हेंबर २०२५ ते एप्रिल २०२६ या कालावधीतील थकीत बोनस व रजेचे वेतन माहे मे २०२६ च्या वेतनात समाविष्ट करून अदा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक महिन्यांपासून कपात झालेली प्रलंबित रक्कम सर्व वीज कंत्राटी कामगारांना परत मिळणार आहे.

संघाच्या पाठपुराव्यामुळे व सातत्यपूर्ण संघर्षामुळे प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेतल्याचे सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी नमूद केले.

संपर्क पोर्टलवर कोर्ट केस कामगारांची नावे स्पष्ट दिसतील प्रमुख नियोक्त्याच्या लेखी सुचने शिवाय कंत्राटदार कामगार कपात करणार नाही, दोषी कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकले जाईल असे आश्वासन गुरुवार दि.१६ एप्रिल रोजी राज्य ऊर्जामंत्री मेघना दीदी बोर्डीकर यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या बैठकीत MSEB होल्डिंग कंपनी संचालक विश्वास पाठक, महावितरण चे संचालक (मा. सं) राजेंद्र पवार व मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके यांनी दिले.अध्यक्ष निलेश खरात यांनी आभार मानले. या बैठकीला सागर पवार , उमेश आणेराव, राहुल बोडके, अरुण पिवळं व प्रशांत भाम्बुर्डेकर उपस्थित होते.

भारतीय मजदूर संघाचा १६ एप्रिल रोजी मुंबई बांद्रा येथे राज्य व्यापी कामगार आक्रोश मोर्चा झाला या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सोबत भारतीय मजदूर संघाच्या शिष्टमंडळा सोबत बैठक होणार असल्याची माहिती प्रदेश अध्यक्ष अनिल ढुमने यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Icon Join Our WhatsApp Channel
error: Content is protected !!