जनसंपर्कात सत्य आणि नैतिकता महत्त्वाची : उपसंचालक प्रवीण टाके

Share News

पीआरएसआय कोल्हा-पूर चॅप्टरचे उद्घाटन

कोल्हापूर : ‘कोरोना साथीनंतर सर्वच क्षेत्रांचे स्वरूप बदलले आहे, याला जनसंपर्क क्षेत्रही अपवाद नाही. आज जनसंपर्क तंत्रज्ञान स्नेही बनत विविध एआय टूलचा वापर करणे अत्यावश्यक बनले आहे. यामुळे कामास गती मिळते, मात्र याच गतीसोबत विश्वासार्हता जपता आली पाहिजे. जनसंपर्कात मुलभूत विषय वाचन महत्वाचे असून यामुळे आपत्कालीन स्थितीतही सत्य आणि नैतिकता यांचे महत्व टिकवता येते, असे मत विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक प्रवीण टाके यांनी व्यक्त केले. यावेळी, ‘पीआरएसआय कोल्हापूर चॅप्टरचे’ अधिकृत उद्घाटन झाल्याचे प्रवीण टाके यांनी जाहीर केले.

शिवाजी विद्यापीठाच्या सांख्यिकी विभाग सभागृहात आयोजित पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडिया (पीआरएसआय) च्या कोल्हापूर चॅप्टर उद्धघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भारतीय सुरक्षा सेनेच्या दक्षिण कमांडचे जनसंपर्क अधिकारी अंकुश चव्हाण, सोलापूर विद्यापीठाच्या पत्रकारिता व जनसंवाद विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर, कोल्हापूर चॅप्टरच्या अध्यक्ष प्रा.डॉ. निशा मुडे-पवार, सचिव विश्वजीत भोसले, कोषाध्यक्ष सचिन मोरे उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. रवींद्र चिंचोलकर म्हणाले, एआयच्या काळात माहितीची सत्यता तपासणे आवश्यक बनले आहे. जनसंपर्क व माध्यमातील सर्वांनाच प्रॉम्प्ट ट्रेनिंग आवश्यक आहे. एआयचा वापर शिकल्यास नोकऱ्यांची संधी उपलब्ध असेल. पीआरएसआयच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना खाजगी क्षेत्रात कामाची संधी मिळू शकते.’ अंकुश चव्हाण म्हणाले, ‘आपत्कालीन स्थितीत पहिले काही तास गोल्डन अवर म्हणून महत्वाचे असतात. यंत्रणेने नेमके काय चुकले ते शोधून दुरुस्ती करणे गरजेचे असते. घटना घडल्यानंतर माध्यमांना तत्काळ योग्य माहिती दिल्यास नंतर खुलासा करण्याची गरज पडत नाही.’

यावेळी शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे माजी विद्यार्थी व भारतीय सुरक्षा सेनेच्या दक्षिण कमांडचे जनसंपर्क अधिकारी अंकुश चव्हाण यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अनुराधा ईनामदार व डॉ. चंद्रशेखर वानखेडे यांनी केले. कार्यक्रमास कार्यकारणी सदस्य, जनसंपर्क, जाहिरात आणि विविध माध्यम क्षेत्रात कार्यरत व्यक्ती तसेच माध्यम क्षेत्रातील विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Icon Join Our WhatsApp Channel
error: Content is protected !!