कोल्हापूरातील रंकाळा परिसरात पर्यटकांसाठी पार्किंग सुविधा

Share News

नो पार्किंग झोनमध्ये वाहन उभे केल्यास कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून कडक कारवाई..

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील प्रमुख पर्यटनस्थळ वाहतूक असलेल्या रंकाळा तलाव परिसरात वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून पर्यटकांच्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शालिनी पॅलेससमोरील खाजगी जागेचे सपाटीकरण करून १६ मे पासून ही सुविधा सुरू करण्यात आली असल्याची माहिती कोल्हापूर वाहतूक नियंत्रण शाखेकडून देण्यात आली.

रंकाळा टॉवर चौकाकडे येणाऱ्या सर्व मार्गांवर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून वाहनांची अस्ताव्यस्त पार्किंग केली जात असल्याने परिसरात वाहतूक कोंडी निर्माण होत होती. यामुळे स्थानिक नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत होता. नागरिकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांच्या निर्देशानुसार २६ मार्च
२०२५ पासून रंकाळा टॉवर परिसर नो पार्किंग झोन घोषित करण्यात आला आहे
. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी दुचाकी वाहनांसाठी करवीर तीर्थ बिल्डिंगमधील श्रावस्ती हॉस्पिटलच्या बेसमेंटमध्ये पे ॲन्ड पार्क सुविधा यापूर्वीच सुरू करण्यात आली होती.वरून मात्र आता रंकाळा परिसरात चारचाकी, जीप आणि टेम्पो ट्रॅव्हलरसारख्या वाहनांची संख्याही वाढू लागल्याने पर्यटनाच्या वाहनांकरिता अतिरिक्त पार्किंगची गरज निर्माण झाली होती.

शालिनी पॅलेस ते रंकाळा टॉवर आणि जुना वाशी नाका ते रंकाळा टॉवर या दोन्ही मार्गांवर रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी राहत असल्याने वाहतुकीचा वेग मंदावत होता. यावर उपाय म्हणून शालिनी पॅलेससमोरील मोकळ्या जागेत पर्यटकांसाठी अधिकृत पार्किंग सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. पर्यटकांना पार्किंग स्थळ सहज सापडावे यासाठी रंकाळा परिसरात विविध ठिकाणी मार्गदर्शक फलक लावण्यात आले असून त्यावर क्यूआर कोडची सुविधाही देण्यात आली आहे. या क्यूआर कोडद्वारे वाहनचालकांना पार्किंग स्थळाचा मार्ग सहज मिळणार आहे.

रंकाळा टॉवर परिसर हा नो पार्किंग झोन असल्याने रस्त्याच्या कडेला कोणतेही वाहन उभे करू नये, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून सर्व वाहनधारकांनी उपलब्ध अधिकृत पार्किंग सुविधेचाच वापर करावा. असे आवाहन नागरिकांना कोल्हापूर वाहतूक नियंत्रण शाखेकडून पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Icon Join Our WhatsApp Channel
error: Content is protected !!