
गडहिंग्लज : कोल्हापूर जिल्ह्यात शक्तीपीठ विरोधात भाजपसह , राष्ट्रवादी अजित पवार गट , जनसुराज्य पक्षाचे नेते व कार्यकर्ते आक्रमक झाले असून शक्तीपीठ महामार्ग कोणत्याही परिस्थितीमध्ये होवू न देण्याचा निर्धार गडहिंग्लज येथे राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्वांनी एकमताने करण्यात आला.
राज्यामध्ये दिवसेंदिवस शक्तीपीठ विरोधातील लढा तीव्र होत आहे. कोल्हापूर जिल्हयात स्वाभिमानीसह कॅाग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार, जनता दल यांच्यासोबत आता भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी अजित पवार गट आंदोलनात सक्रीय सहभाग नोंदवित शेतक-यांच्या बाजूने ठामपणे उभे राहिले आहेत.
चंदगडचे अपक्ष आमदार शिवाजी पाटील यांनी गडहिंग्लज व चंदगड तालुक्यातून शक्तीपीठ महामार्ग घेऊन जाण्याची मागणी केल्यानंतर तीनही तालुक्यात शेतकरी तसेच संघटना व सर्वच पक्ष आक्रमक झाले आहेत. या महामार्गामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान होणार असून सध्या गोव्याला जाण्यासाठी या तीन तालुक्यातून चार रस्ते जातात यामुळे नवीन शक्तीपीठ महामार्गाची आवश्यकता नसल्याची स्थानिक नागरीकांचे म्हणने आहे.
एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सक्तीने महामार्ग करण्यासाठी प्रयत्न करत असताना. कोल्हापूर जिल्ह्यातून भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसून येवू लागले आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात शक्तीपीठ विरोधात विरोधकांची वज्रमूठ होवू लागली आहे.