
कागल शहरातील माळी गल्लीत भरदिवसा घरफोडीची धक्कादायक घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून सुमारे ५ लाख 70 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड चोरून नेल्याची घटना काल घडली. याप्रकरणी कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सचिन अशोकराव पाटील (वय ४५, रा. माळी गल्ली, कागल, मूळ गाव – बारवाड, ता. निपाणी, जि. बेळगाव) हे आपल्या पत्नीसमवेत सकाळी ९ वाजता यळगुड येथे कामानिमित्त गेले होते. सायंकाळी ५.३० वाजता परत आल्यानंतर त्यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडल्याचे निदर्शनास आले. घरात प्रवेश करून पाहणी केली असता, प्लायवुड कपाट फोडून त्यातील सोन्याचे गंठन, सोन्याचा नेकलेस, टॉप्स, कानवेल, अंगठ्या, मणी मंगळसूत्र, चांदीचे पैंजन व जोडवी असा एकूण ५ लाख ७० हजार रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचे उघड झाले.
या घटनेची नोंद घेतली असून, गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली कागल पोलीस करत आहेत. बंद घरांच्या चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले असून, चोरट्याचा तात्काळ शोध घेऊन कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.