
कुपवाड : श्रीमंत कॉलनीतील रहिवासी 35 वर्षीय विकास शामराव मराठे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी कुपवाड औद्योगिक पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
ही घटना आज दुपारी सुमारास घडली. विकास मराठे यांनी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेतल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना मिळाली. त्यानंतर त्यांचे भाऊ शिवाजी शामराव मराठे यांनी त्यांना तात्काळ मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासल्यानंतर मृत घोषित केले.
मयताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी तजवीज स्वरूपात ठेवण्यात आला असून, आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. कुटुंबीयांचा जबाब आणि वैद्यकीय अहवालानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेमुळे श्रीमंत कॉलनी परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, सहा पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास कुपवाड पोलीस करत आहेत.