
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अखेर आपल्या राजीनाम्याच्या आणि भाजप प्रवेशाच्या चर्चांवर मौन सोडत स्पष्ट भूमिका मांडली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांचा राजीनामा आणि पक्षांतराच्या चर्चांनी जोर धरला होता. मात्र जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना या चर्चांना पूर्णविराम देत स्पष्टपणे सांगितले की, भाजपमध्ये प्रवेशासाठी कुणी मला विचारलेले नाही आणि मीही कुणाला विनंती केलेली नाही.
त्यांनी माध्यमांवर टोला लगावत म्हटले, माझ्या राजीनाम्याच्या चर्चा सुरू आहेत, मी कुठे जाणार हे माध्यमांनीच ठरवून टाकलंय! मला आश्चर्य वाटतं. माझ्या सहाय्यकाने मला बातमी दाखवली तेव्हा मलाही धक्का बसला. सूत्र कुठे आहेत ते दाखवा, मला त्यांना भेटायचं आहे!
राजकीय हालचाली आणि बैठकींवरून उडणाऱ्या चर्चांवर भाष्य करताना पाटील म्हणाले, कोणी कुणाला भेटले तरी त्यावरून बातमी होते. साध्या भेटीगाठींपासून आपण पराचा कावळा करतो. मी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहे आणि पक्षाचे काम करतो. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत राहणार आहे.
भाजप नेत्यांशी चांगले संबंध असल्याचे कबूल करत जयंत पाटील म्हणाले, भाजपचे अनेक नेते माझे चांगले मित्र आहेत. पण त्यामुळे भाजप प्रवेशाची चर्चा करणे हास्यास्पद आहे. भाजपकडून कुठलाही थेट संपर्क आलेला नाही.
माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्यांवर वारंवार प्रतिक्रिया देणे संयुक्तिक वाटत नाही, असे स्पष्ट करत पाटील म्हणाले, पक्ष बदलाच्या बातम्या सतत येत असतात. मी त्या खोडून काढत नाही. कालांतराने त्या मागे पडतात. त्यामुळे प्रत्येकवेळी स्पष्टीकरण देत बसणे योग्य नाही.
जयंत पाटील यांच्या या स्पष्ट भूमिकेनंतर त्यांचे पक्षांतर होणार असल्याच्या चर्चांना काहीअंशी विराम मिळाला असून, त्यांच्या या विधानामुळे सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेला वेगळं वळण मिळालं आहे.