
कोल्हापूर : शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने पोलीस मुख्यालय येथील ट्रॅफिक गार्डनमध्ये विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष प्रशिक्षण उपक्रमास आज उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात येत असून, यामध्ये दररोज शालेय विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात येत आहे.
आज ताराराणी विद्यापीठ शाळेचे तब्बल ६० विद्यार्थी ट्रॅफिक गार्डनमध्ये सहभागी झाले. सकाळी झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वाहतूक सिग्नल्स, झेब्रा क्रॉसिंग, ओव्हरब्रिजवरील व बोगद्यामधील सुरक्षित वाहनचालना, तसेच विविध ट्रॅफिक चिन्हांची सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी पोलिस दलातील बीडीडीएस श्वान पथकाचे थरारक प्रात्यक्षिक आणि हत्यारांचे सादरीकरण विद्यार्थ्यांसमोर करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी फ्लॅग दाखवून केले. या वेळी अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरज कुमार, पोलीस उपअधीक्षक (गृह) सुवर्णा पत्की, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, राज्य कोषाध्यक्ष साळवी, चेंबर्स ऑफ कॉमर्सचे सचिव जयेश ओसवाल व सदस्य किरण ओतारी यांची उपस्थिती लाभली.
शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी प्रास्ताविक केले, तर आरएसपीचे जिल्हा समादेशक श्रीकांत मोरे यांनी आभार मानले.
या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांबद्दल जागरुकता निर्माण करण्याचा उद्देश आहे. कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाने सर्व शाळांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपल्या शाळांतील विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी करून घ्यावे, जेणेकरून भविष्यात सुरक्षित वाहतूक संस्कृती बळकट होईल.