
कोल्हापूर : शक्तीपीठ महामार्ग हा कोल्हापूर जिल्ह्याच्या व राज्याच्या उन्नतीसाठीच असून, शेतकरी बांधवांच्या भल्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठीचं माझा खटाटोप सुरू आहे. मुंबईमध्ये झालेल्या बैठकीत शक्तीपीठ महामार्ग समर्थन समितीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. राजू शेट्टी यांच्या मतदार संघातील शिरोळ हातकलंगले तालुक्यातून 75 टक्के समर्थन शेतकरी बांधवांनी दिला असून, येणाऱ्या काळात शंभर टक्के शेतकरी बांधव शक्तिपीठ महामार्गास समर्थन देतील.
राजू शेट्टी यांनी केलेल्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. 2019 च्या निवडणुकीत मला पराभूत करण्यासाठी विरोधकांकडे कोणतेही मुद्दे नसल्याने माझी बदनामी करण्यासाठी हे आरोप केले गेले. पण हे आरोप खोटे असल्याचे सिद्ध झाले असून, हे आरोप राजू शेट्टी यांनी सिद्ध करावेत. अन्यथा त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकण्यात येईल.
महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे चित्र दिसत असून, खोटं बोल पण रेटून बोल हीच त्यांची प्रवृत्ती राहिली आहे. त्याचमुळे जिल्ह्यातील नागरिकांनी महाविकास आघाडीला त्यांची जागा दाखवली आहे आणि येणार्या काळात ही महाविकास आघाडीला जनता त्यांची जागा नक्कीच दाखवून देईल.
सध्या राजू शेट्टी यांच्याकडे कोणतेही काम शिल्लक नाही. शेतकरी बांधवांना फसवून त्यांनी कारखानदारांशी युती केली आहे. त्यामुळे त्यांना पैशाच्या गोष्टी दिसत आहेत. त्याचमुळे शेतकरी बांधवांनी ही त्यांना त्यांची जागा दाखवून दिली हे झालेल्या निवडणुकीच्या निकालावरून दिसून येते. विकासाला विरोध करून शेतकरी बांधवांची दिशाभूल करण्याचे काम राजू शेट्टी यांनी बंद करावे. त्यांच्या अशा दिखाऊपणामुळे शेतकरी बांधवांनी त्यांच्या पाठीशी राहिलेले नाहीत याचे आत्मचिंतन त्यांनी करावे, असा सल्ला आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिला.