
मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, भाजपने थेट महाविकास आघाडीतील नेत्यांच्या घरात घुसून मोठा झटका दिला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे विश्वासू सहकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक उत्तम कोराणे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या ५५ कार्यकर्त्यांसह मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला.
मुंबईत पार पडलेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, तसेच खासदार धनंजय महाडिक प्रमुख उपस्थित होते. कोल्हापूर महापालिकेसाठी महायुतीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम महत्त्वाचा ठरतोय.
या पक्षप्रवेशात काँग्रेसचे माजी नगरसेवक दिलीप पोवार, सरस्वती पोवार, आणि राष्ट्रवादीचे उत्तम कोराणे यांच्यासह एकूण ५५ जणांचा भाजपमध्ये दाखल होणं, ही महाविकास आघाडीसाठी मोठी धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे उत्तम कोराणे हे हसन मुश्रीफ यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते.
या प्रवेशामुळे भाजपने महापालिकेच्या राजकारणात आघाडी घेतली आहे, असेच मानले जात आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेने भाजपच्या काही नगरसेवकांना गळाला लावले होते, त्यामुळे भाजपला धक्का बसला होता. आता भाजपने प्रतिउत्तर देत महाविकास आघाडीतील माजी नगरसेवकांना आपल्या बाजूने वळवण्यास सुरूवात केली आहे.
महायुतीतर्फे महापालिका निवडणुका लढवल्या जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले असून, त्यामुळे भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यातच अंतर्गत ताकद वाढवण्यासाठी कार्यकर्ते फोडले जात आहेत.
राजकीय विश्लेषकांच्या मते, हा पक्षप्रवेश म्हणजे हसन मुश्रीफ यांच्यासाठी एक प्रत्यक्ष राजकीय इशारा असून, कोल्हापूर जिल्ह्यातील आगामी सत्तासंघर्ष आणखी चुरशीचा होणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत.