
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी आज अखेर पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. गेल्या सात वर्षांपासून पक्षाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळणारे जयंत पाटील यांनी पदमुक्तीची विनंती करताना, आपल्या कामकाजाचा आढावा घेत एक भावनिक भाषण दिलं.
पद सोडण्यापूर्वी जयंत पाटील म्हणाले, सात वर्षे मी एकदाही सुट्टी घेतली नाही, बायकोलाही हे सांगितलं. मला साहेबांनी (शरद पवारांनी) अध्यक्षपदाची संधी दोनदा दिली. आता ही योग्य वेळ आहे की मी बाजूला व्हावं.
आपल्या भाषणात त्यांनी पुसेसावळी दंगल, मुंबई महापालिका निवडणूक, हिंदी भाषेची सक्ती यावरून सरकारवर टीकास्त्र सोडलं. शिवरायांच्या स्वराज्यावर आज उत्तरेकडील प्रभाव दिसतो आहे, असे ते म्हणाले.
पक्ष फाटल्यानंतरही आपण पॅनिक न होता डटे राहिलो आणि अपात्रतेची कारवाई तातडीने प्रस्तावित केली, असे ते म्हणाले. तसेच, मी कधीही वेगळा गट किंवा फाउंडेशन निर्माण केलं नाही, एकनिष्ठ राहिलो, असा पुनरुच्चार त्यांनी केला.
जयंत पाटील यांनी नव्या अध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांचं नाव सुचवल्यानंतर, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अधिकृत घोषणा केली. शिंदे यांच्यावर आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाला बळकटी देण्याची जबाबदारी असणार आहे.