
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे रविवारी झालेल्या शाईफेक प्रकरणानंतर मराठा समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आज सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत १८ जुलै रोजी अक्कलकोट बंद पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या बंदच्या यशस्वी आयोजनासाठी उद्या अक्कलकोटमध्ये नियोजन बैठक होणार आहे.
बैठकीत प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा जोरदार निषेध करताना, हल्लेखोर आरोपींना तात्काळ अटक करावी आणि त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी मराठा समाजाचे समन्वयक, सकल मराठा समाजाचे माऊली पवार, तसेच मराठा क्रांती मोर्चाचे दिलीप कोल्हे यांची उपस्थिती होती.
या बैठकीदरम्यान काही काळासाठी अमोलराजे भोसले यांच्याबाबत गैरसमज निर्माण होऊन तणावाचे वातावरण झाले. मात्र, समन्वयकांच्या मध्यस्थीने गैरसमज दूर करत बैठक सुरळीत पार पडली. याच बैठकीत जन्मेजयराजे भोसलेही अक्कलकोट बंदमध्ये सहभागी होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी स्पष्ट केले की, प्रवीण गायकवाडांवर हल्ला म्हणजे समस्त मराठा समाजावरच हल्ला आहे. या हल्ल्यात सहभागी आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, पॅरोलवर बाहेर आल्यावर त्यांनी संघटित स्वरूपात हा हल्ला घडवून आणला आहे. जोपर्यंत या आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई होत नाही, तोपर्यंत मराठा समाज गप्प बसणार नाही.
अक्कलकोट बंदनंतर सोलापूर बंद आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणावर मोर्चे काढण्याचा इशारा देत, राज्य सरकारने तत्काळ कडक पावले उचलावीत, अन्यथा मराठा समाज रस्त्यावर उतरल्यावर परिणामांची जबाबदारी शासनाची राहील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.