
सांगली | प्रतिनिधी
येणाऱ्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि महिला सुरक्षा तसेच सामाजिक जनजागृतीसाठी आज पोलीस अधीक्षक कार्यालय, सांगली येथे पोलीस, महसूल, जिल्हा परिषद, शिक्षण व आरोग्य विभाग यांची संयुक्त समन्वय बैठक पार पडली.
या बैठकीत सण-उत्सव, निवडणुका, शक्तीपीठ महामार्ग व रेल्वे पुनर्वसन आंदोलन अशा संभाव्य सामाजिक व राजकीय घडामोडींवर चर्चा झाली. यावेळी पोलीसांनी प्रतिबंधात्मक कारवायांवर भर देत उपविभागीय अधिकारी, पोलीस अधिकारी व तहसीलदार यांच्यात अधिक समन्वय साधण्याचे निर्देश देण्यात आले.
महिला व मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने ‘कन्या सबलीकरण योजना’ अधिक प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना स्वरक्षण प्रशिक्षण, मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यासाठी पोलीस, शिक्षण आणि महसूल विभाग संयुक्त कृती आराखडा तयार करणार आहेत.
जिल्ह्यातील रिक्त पोलीस पाटील पदे तत्काळ भरण्याच्या सूचना उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. यासोबतच गावागावातील तंटामुक्ती समित्यांची नव्याने स्थापना करण्यासह येणाऱ्या ग्रामसभांमध्ये यावर निर्णय घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले.
जिल्ह्यातील अंमली पदार्थविरोधी मोहिमेस अधिक गती देत शिक्षण विभागाच्या सहकार्याने विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यावर भर देण्यात आला. तसेच शासकीय रुग्णालयातून पोक्सो कायदा व एमएलसी (MLC) प्रकरणांची माहिती तातडीने संबंधित पोलीस ठाण्यांना पाठवण्याचे आदेश देण्यात आले. जखमींच्या वैद्यकीय प्रमाणपत्रांची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण व्हावी, यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक व मिरज शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना सूचना देण्यात आल्या.
या महत्त्वपूर्ण बैठकीस जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक, जिल्हा शल्यचिकित्सक, अधिष्ठाता मिरज रुग्णालय व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
ही समन्वय बैठक जिल्ह्यातील सुरक्षितता, शिस्तबद्ध सण साजरे करणं, महिला सुरक्षा आणि समाजप्रबोधनाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल ठरणार आहे.