जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयातील भोंगळ कारभार थांबवावा, अन्यथा कार्यालयाला टाळे ठोकू – शिवसेना शहरप्रमुख रणजीत जाधव

Share News

कोल्हापूर : कोल्हापुरातील भूमी अभिलेख कार्यालय असून अडचण नसून खोळंबा ठरत आहे. या कार्यालयातील कारभारात अनियमितता होत असून, भोंगळ कारभाराच्या अनेक तक्रारी शिवसेनेकडे येत आहेत. या कार्यालयातील प्रमुख अधिकारी कुठे आहेत हे कर्मचाऱ्यांना माहिती नाही आणि कर्मचारी काय करतात हे अधिकाऱ्यांना माहिती नाही, असा रामभरोसे कारभार या कार्यालयात सुरू आहे. याठिकाणी एजंटांची साखळी निर्माण झाली असून, सर्वसामन्य नागरिक, शेतकरी बांधवांची राजरोज लुट सुरु आहे. हा भोंगळ कारभार तात्काळ थांबवावा, अन्यथा कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशारा शिवसेना शहरप्रमुख रणजीत जाधव यांनी दिला. जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयातील भोंगळ कार्यालयाबाबत शिवसेनेच्या शिष्ठमंडळाने निवासी उप जिल्हाधिकारी संजय तेली यांची भेट घेवून निवेदन सादर केले.

शिवसेनेच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनामध्ये, शेतकरी आणि मालमत्ता धारकांनी गेल्या तीन-चार वर्षांपासून पैसे भरले, परंतु अद्याप त्यांची मोजणी झालेली नाही. मात्र धनदांडग्या लोकांची मोजणी मात्र तात्काळ पूर्ण केली जात आहे. साध्या मोजणीचे शुल्क भरूनही धनदांडग्यांची अति-अति जलद मोजणी झाल्याची उदाहरणे आहेत. काही धनदांडग्यांची मोजणीचे पोटहिस्सेही चुकीच्या मार्गाने पूर्ण केले जात आहेत. बऱ्याच ठिकाणी पूर्वी कार्यालयाने दिलेल्या हद्दी, खुणा जाणून बुजून चुकीच्या दाखवल्या जात आहेत. धनदांडग्यांचे मोजणी शीट पूर्ण करताना त्या गटाची मोजणी अपूर्ण असतानाही पोटहिस्सा मात्र त्वरित पूर्ण करून दिला गेला, संबंधित शेतक-यांनी यापूर्वी मोजणी शुल्क भरलेले असतानाही मोजणी केली नसल्याचे सांगितले.

मालमत्तेसंबंधी कामे भूमी अभिलेख कार्यालयाकडे असते. पूर्वी फेरफार किंवा आखीव पत्रिकेचे काम हे हस्तलिखीत पद्धतीने करण्यात येत होते. परंतु आता ही काम ऑनलाइन पध्दतीने होतात. ऑनलाइन प्रणाली नव्याने सुरु झाल्यानंतर यामध्ये काही अडचणी येत होत्या. परंतु त्या नंतर ऑनलाइन प्रणालीत सुधारणा करण्यात आली. जेव्हा काम होण्यास सुरुवात झाली तेव्हा येथील कार्यालयातील फेरफारची कामे करणाऱ्या कर्मचा-यांची बदली झाली. परिणामी ही कामे ठप्प पडली आहेत, त्यामुळे नागरिकांची कामे पुन्हा खोळंबली आहेत. यासंदर्भात येथील अधिकाऱ्यांना विचारणा केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. यासह भूमी अभिलेख कार्यालयाअंतर्गत वारसा नोंदची अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. यासाठी अर्थपूर्ण व्यवहार केले जात असल्याच्या तक्रारी होत आहेत. यासर्व कामांसाठी एजंटांची साखळी तयार झाली असून, नागरिक व शेतकऱ्यांची राजरोस लुट होत आहे. हा भोंगळ कारभार तात्काळ थांबवावा अन्यथा शिवसेना स्टाईलने कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा दिला.

यावेळी महानगरसमन्वयक कमलाकर जगदाळे, उपजिल्हाप्रमुख रमेश खाडे, तुकाराम साळोखे, दीपक चव्हाण, विनय वाणी, राहुल चव्हाण, शहरसमन्वयक सुनील जाधव, अनुसूचित जाती जमाती जिल्हाप्रमुख निलेश हंकारे, शहरप्रमुख प्रभू गायकवाड, दुर्गेश लिंग्रस, फेरीवाले सेना शहरप्रमुख अर्जुन आंबी, सचिन पाटील, सुरेश माने, सुभाष भोसले, आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Icon Join Our WhatsApp Channel
error: Content is protected !!