
कुपवाड : औद्योगिक वसाहतीतील नटराज कंपनीजवळ घडलेल्या तरुणाच्या खून प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली व कुपवाड औद्योगिक पोलिस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत ही कामगिरी करण्यात आली आहे. उमेश मच्छिंद्र पाटील (वय २१, रा. श्रीनगर मशिद जवळ, कुपवाड) याचा खून प्रेमसंबंधातील वादातून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
२७ जून रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास नटराज कंपनीजवळ उमेश पाटीलच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून खून केला होता. या प्रकरणी कुपवाड औद्योगिक पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानीक गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस निरीक्षक सतिश शिंदे व कुपवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांच्या नेतृत्वाखाली दोन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली होती.
गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी साहिल उर्फ सुमित मधुकर खिलारी (वय २४, रा. मूळ बुलढाणा, सध्या रा. बामणोली, कुपवाड) याला फॉरेस्ट ऑफिस रोडजवळ यश सर्व्हिस सेंटर परिसरातून अटक केली. चौकशीत त्याने व त्याच्या साथीदार सोन्या उर्फ अथर्व किशोर शिंदे (वय २०, रा. बामणोली, कुपवाड) आणि एका अल्पवयीन मुलाने मिळून प्रेमसंबंधातून झालेल्या वादातून उमेश पाटीलचा खून केल्याची कबुली दिली.
त्यानंतर दुसऱ्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे कवलापूर येथील विमानतळ परिसरातून अथर्व शिंदे यालाही अटक केली. दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील तपास कुपवाड औद्योगिक पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विश्वजित गाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.