
मुंबई दि.३० : कोल्हापुरातील उबाठा गटाचे नवनियुक्त शहरप्रमुख यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. आमदार राजेश क्षीरसागर यांनी पुढाकार घेवून हा पक्षप्रवेश घडवून आणला. मुंबई येथील मुक्तगिरी या शासकीय निवासस्थानी हा पक्ष प्रवेश पार पडला.
हर्षल सुर्वे हे गेले वीस वर्ष शिवसेना व नंतर उबाठा गटामध्ये कार्यरत आहेत. युवा सेना जिल्हाप्रमुख कोल्हापूर त्यानंतर रायगड जिल्हा विस्तारक कोल्हापूर जिल्हा विस्तारक या पदावर काम केले आहे. यासह शिवसेना (उबाठा) शहर समन्वयक या पदावर काम करत होते. नुकतीच त्यांना या गटामध्ये शहरप्रमुख म्हणून जबाबदारी दिली होती. पण, जिल्हाप्रमुख पदावर नाव निश्चित असताना ऐनवेळी तिथे दुसरी वर्णी लावून जे पद मागितलेले नाही त्या पदाची जबाबदारी देण्यात आली. ज्या व्यक्तीला ही जबाबदारी दिली त्याच्यासोबत काम करणार नाही असा पवित्रा घेत त्यांनी पदाचा राजीनामा दिला आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पुढाकाराने मुंबईमध्ये जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत शिवसेनेत प्रवेश केला. यासह त्यांनी शिवसेना संसदीय गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचीही भेट घेतली. हर्षल सुर्वे यांच्यासोबत उपशहरप्रमुख अर्जुन संकपाळ, इंद्रनील पाटील, प्रदीप हांडे, जयाजी घोरपडे, संकेत खोत, देवेंद्र सावंत यांनी सुद्धा शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.