हर्षल पाटीलच कंत्राटदार, कामेही केले पूर्ण, सत्ता आहे म्हणून काहीही कराल, काळ माफ करणार नाही, संघटनांचा संताप

Share News

सांगली | जलजीवन मिशन अंतर्गत कामे पूर्ण करूनही सरकारकडून थकबाकी रक्कम न मिळाल्याने सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तरुण कंत्राटदार हर्षल पाटील यांनी स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशिक्षित, अभियंता असलेले हर्षल पाटील यांनी देयकासाठी अनेक वेळा सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या मारल्या होत्या, मात्र काहीच प्रतिसाद मिळाला नाही. या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत असून, राज्यातील विविध कंत्राटदार संघटनांनी आक्रोश व्यक्त केला आहे.

राज्य सरकारकडून ही आत्महत्या झाकण्यासाठी आणि जबाबदारी नाकारण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा आरोप देखील करण्यात येतो आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी हर्षल पाटील हे कंत्राटदारच नव्हते असा दावा केला. मात्र, सांगली जिल्ह्यातील तांदूळवाडी येथे जलजीवन योजनेच्या फलकावर हर्षल व त्यांच्या बंधू अक्षय पाटील यांची नावे स्पष्टपणे नमूद असल्याने, सरकारचा दावा खोटा ठरत असल्याचे चित्र आहे.

महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ, राज्य अभियंता संघटना आणि पाणीपुरवठा विभागाशी संबंधित संघटनांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार टीका केली. सत्ता आहे म्हणून काहीही दावे-प्रतिदावे कराल, पण काळ माफ करणार नाही, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी स्पष्टपणे म्हटले की, एक वर्षांपासून राज्यातील कंत्राटदारांना जवळपास 90 हजार कोटींचे देयक मिळालेले नाहीत, त्यामुळे अनेक कंत्राटदार आंदोलन करत आहेत.

संघटनांनी सरकारला विचारले आहे की, जर देयक थकीत असल्यामुळे डिसेंबर 2025 पर्यंत एकही नवीन शासकीय काम मंजूर करायचे नाही, असा शासन निर्णय घेण्यात आला आहे, तर मग विकासकामे ठप्प होण्याची जबाबदारी कोणाची? अशा अपमानास्पद वक्तव्यांमुळे नवीन उद्योजक तरुण पिढीला चालना देण्याऐवजी नैराश्य आणि मृत्यूची वाट दाखवली जात आहे, ही बाब अत्यंत लाजिरवाणी असल्याचेही संघटनांनी नमूद केले.

सदर घटना ही केवळ एक आत्महत्या नसून, शासनाच्या दुर्लक्षाचा आणि असंवेदनशीलतेचा परिणाम आहे, असा आरोप करत या प्रकरणी संबंधित मंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी देखील करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Icon Join Our WhatsApp Channel
error: Content is protected !!